RCB vs DC WPL 2026 Final Update Marathi News : महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) चा खिताबी सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. महिला आयपीएलचा हा चौथा हंगाम असून, दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र आतापर्यंतच्या तीनही फायनलमध्ये दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यंदा मात्र पहिल्या वहिल्या ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची महिला टीम आपला दुसरा WPL किताब जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. आरसीबीने 2023-24 च्या हंगामात पहिल्यांदा WPL ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यात संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टूर्नामेंटमधील दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी
दिल्ली कॅपिटल्सने लीग टप्प्यातील 8 सामन्यांपैकी 4 सामने जिंकत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 7 गडी राखून पराभव करत दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. लीग स्टेजमध्ये दिल्लीची सुरुवात सलग दोन पराभवानी झाली. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला, मात्र चौथ्या सामन्यात पुन्हा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुढील दोन सामने जिंकले, सातव्या सामन्यात हार मानली आणि अखेरच्या आठव्या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.
लीग स्टेजमध्ये बंगळुरूची दमदार कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लीग टप्प्यात अप्रतिम कामगिरी करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. लीग स्टेजनंतर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट फायनलमध्ये संधी मिळते, आणि आरसीबीने हे स्थान आपल्या नावावर केले. आरसीबीने 8 पैकी 6 लीग सामने जिंकत सर्वाधिक 12 गुण मिळवले. मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. आता अंतिम फेरीत पुन्हा दिल्लीशी सामना होत असल्याने ही लढत आणखी रंगतदार होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11 : लिझेल ली (यष्टीरक्षक), शेफाली वर्मा, लॉरा वोलवार्ड्ट, जेमिमा रोड्रिग्स (कर्णधार), मरिजाने कॅप, शिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा,मिन्नू मणी, श्री चारणी, नंदिनी शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग-11 : ग्रेेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नॅडीन डी क्लर्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली साठगरे, श्रेयांका पाटील, लॉरेन बेल
हे ही वाचा -
