Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाता नाईट रायडर्सला 6 विकेट्सनी धूळ चारत धमाकेदार विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार विराट कोहली ठरला. विराटने अवघ्या 58 चेंडूंमध्ये तुफानी शतक झळकावत 105 धावांची खेळी केली आणि इतिहास रचला. या शतकीय खेळीसह विराट टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा भारतीय फलंदाज बनला आहे. 

याशिवाय RCB ने रायपूरच्या शहीद वीर सिंह नारायण सिंह स्टेडियमवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा रन चेज करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. कोलकाताने दिलेलं 193 धावांचं आव्हान बंगळुरूने शानदार पद्धतीने पार करत स्वतःचाच जुना विक्रम मोडला. याआधी याच हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध 167 धावांचं लक्ष्य गाठण्याचा विक्रमही RCB च्याच नावावर होता.

विराट कोहलीने पुन्हा लिहिला इतिहास

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विराटने 58 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. या शतकासह विराटच्या नावावर आता IPL मध्ये एकूण 9 शतकं झाली असून, ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक शतकांची नोंद आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीयांच्या यादीतही विराट अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने अभिषेक शर्माचा 9 शतकांचा विक्रम मागे टाकला. या यादीत केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 8 टी20 शतकं आहेत. तसेच रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांनीही प्रत्येकी 8 शतकं झळकावली आहेत.

अंगक्रिश रघुवंशीचं अर्धशतक

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिन ॲलन (18) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (19) लवकर बाद झाले. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने 46 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी करत डावाला आकार दिला. त्याला कॅमेरून ग्रीनने (32) चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने 29 चेंडूत 49 धावांची नाबाद फटकेबाजी केल्यामुळे केकेआरने 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

विराट कोहलीचा 'विराट' अवतार

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात वादळी झाली. जेकब बेथेल 15 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर विराट कोहलीने मैदानाची सूत्रे आपल्या हातात घेतली. कोहलीने 60 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा ठोकल्या. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत (39) दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

कर्णधार रजत पाटीदार (11) आणि टिम डेव्हिड (2) स्वस्तात बाद झाले, मात्र कोहलीने एका बाजूने किल्ला लढवत आरसीबीला 19.1 षटकांतच विजय मिळवून दिला. जितेश शर्मा 8 धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून कार्तिक त्यागीने भेदक मारा करत 32 धावांत 3 बळी घेतले, तर सुनील नारायणला 1 बळी मिळाला. मात्र, इतर गोलंदाजांना कोहलीच्या झंझावाताला रोखण्यात अपयश आले. वैभव अरोरा आणि अनुकुल रॉय महागडे ठरले, ज्याचा फटका केकेआरला बसला.

हे ही वाचा -

Team India : टीम इंडियात येणार खतरनाक ट्विस्ट! 3 वर्षांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची कुजबुज, BCCIच्या बैठकीत काय शिजतंय?