मुंबई क्रिकेट विश्वचषकापूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल करण्यात आला आहे. जखमी खेळाडू अक्षर पटेलची (Axar Patel) दुखापत अजूनही बरी न झाल्याने आता त्याच्याऐवजी रविचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin ) टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. 


विश्वचषकाच्या संघात (Cricket World Cup 2023 ) बदल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. याचाच अर्थ विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात आज बदल करण्याची संधी आयसीसीने दिली होती. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) अक्षर पटेलच्या ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी दिली आहे. 


विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या चमूमध्ये अक्षर पटेल याचा समावेश आहे. पण अक्षर पटेल सध्या दुखापतीचा सामना करत आहे. अक्षर पटेलच्या अनुपस्थिती संधी मिळालेल्या अश्विन याने भेदक मारा केला. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनने दमदार कामगिरी केली. त्यामुळे अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. 


आशिया चषकात अश्विनचा टीम इंडियामध्ये समावेश नव्हता. पण अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला अन् अश्विनचे नशीब बदलले. अश्विनचा मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. 


37 वर्षीय अश्विन हा भारतात झालेल्या 2011 मधील क्रिकेट विश्वचषकाच्या विजयी संघात होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली आणि अश्विन हे दोनच खेळाडू 2011 मधील विजयी संघाचे 2023 च्या विश्वचषकात खेळणार आहेत. 


भारत आपल्या विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून करणार आहे. चेन्नई मध्ये टीम इंडिया पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे. त्याआधी भारताचे सराव सामने होणार आहेत. टीम इंडिया 30 सप्टेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर 3 ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. 


अश्विनची एकदिवसीय सामन्यातील कारकीर्द


अश्विनने भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये रवी अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याशिवाय गरज पडल्यास अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.


क्रिकेट विश्वचषक 2023 साठी टीम इंडिया : 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी,  ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन