आर अश्विनने भारताच्या प्लेईंग इलेव्हनवर सवाल उपस्थित केलाय. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, टीम इंडियाचा दिवस वाईट गेला, कारण पावसामुळे षटकांची संख्या कमी झाली आणि भारताने नाणेफेकही जिंकली नव्हती. प्लेईंग इलेव्हनबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, मी समजू शकतो की अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीसह दोन फिरकी गोलंदाज का आहेत, कारण त्यांना फलंदाजीत खोली हवी आहे. वॉशिंग्टन आणि अक्षर फलंदाजी करू शकतात, परंतु त्यांनी गोलंदाजीवर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही मोठी मैदाने आहेत आणि जर कुलदीप अशा मैदानांवर गोलंदाजी करू शकत नसेल तर तो कुठे गोलंदाजी करेल?, असा सवाल अश्विनने उपस्थित केला.
अतिरिक्त फलंदाज हवा म्हणून त्यांना खेळवू नये- अश्विन (R Ashwin On Ind vs Aus 1st ODI Match)
तुम्हाला फलंदाजीत खोली हवी असेल आणि जर तुम्हाला फलंदाजीने सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. धावा करणे ही फलंदाजांची भूमिका आहे. तुम्ही चांगले गोलंदाज खेळवावेत, फक्त अतिरिक्त फलंदाज हवा म्हणून त्यांना खेळवू नये, असं अश्विनने सांगितले.
सामना कसा राहिला? (Ind vs Aus 1st ODI Match)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने बऱ्याचदा अडथळा आणला, ज्यामुळे षटकांची संख्या 50 वरून 26 करण्यात आली. या कमी षटकांच्या सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करताना दिसले. भारताने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 136 धावा केल्या, मात्र डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. हे लक्ष्य कांगारूंनी सहज पार करत 7 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.