Rajat Patidar News : धावांची टाकसाळ उघडली, तरीही भारतीय संघात स्थान मिळालं नाही, आता कॅप्टन रजत पाटीदारने द्विशतक ठोकलं
Rajat Patidar Ranji Trophy 2025-26 : रजत पाटीदारसाठी 2025 हे वर्ष करिअरमधील सुवर्णवर्ष ठरत आहे. आयपीएल 2025 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 2008 पासून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं.

Madhya Pradesh vs Punjab : रजत पाटीदारसाठी 2025 हे वर्ष करिअरमधील सुवर्णवर्ष ठरत आहे. आयपीएल 2025 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) 2008 पासून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं आणि संघाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. आता तिच दमदार कामगिरी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही कायम ठेवली. दिलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि आता रणजी ट्रॉफी... तीनही स्पर्धांमध्ये रजतची बॅट जबरदस्त फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध द्विशतक ठोकले.
भारतासाठी आतापर्यंत 3 कसोटी आणि 1 एकदिवसीय सामना खेळलेला रजत पाटीदार मागील दोन वर्षांपासून वनडे संघाबाहेर आहे. जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ त्याला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. तरीही त्याची बॅटिंग फॉर्म अफाट आहे. या द्विशतकापूर्वीच्या सात डावांत त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती. सामन्याबद्दला बोलायचं झालं तर, पंजाब संघाने पहिली डावात 232 धावा केल्या. त्यानंतर मध्य प्रदेशने बातमी लिहिल्याच्या वेळेस 8 गडी गमावून 519 धावा केल्या होत्या. कर्णधार रजत पाटीदार 205* तर अरशद खान 60* धावांवर खेळत होते.
CAPTAIN RAJAT PATIDAR HAMMERED A DOUBLE CENTURY FOR MADHYA PRADESH IN RANJI TROPHY. 🔥 pic.twitter.com/bnNZpmnF74
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2025
तुफानी फॉर्मात रजत पाटीदार
रजत पाटीदारने मागील 8 प्रथम श्रेणी डावांत तब्बल 663+ धावा झळकावल्या आहेत. पंजाबविरुद्ध तो 205 नाबाद आहे. मागील तीन प्रमुख देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांनी तीन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे आता त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावे अशी मागणी वाढली आहे. भारत नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी इंडिया ए संघाची दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे पाटीदारला या दोन्ही संघांपैकी एका संघात निवड मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोणाची जागा घेऊ शकतो पाटीदार?
सध्या भारतीय संघात नंबर-3 स्थानावर स्थिर असा फलंदाज सापडलेला नाही. चेतेश्वर पुजारानंतर शुभमन गिल, के.एल. राहुल, करुण नायर, देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांसारख्या अनेक खेळाडूंना या स्थानावर आजमावण्यात आलं, पण कोणीही सातत्य राखू शकले नाहीत. त्यामुळे रजत पाटीदारला या स्थानावर संधी दिली जाऊ शकते. त्याचा सध्याचा फॉर्म आणि सातत्य पाहता, निवड समितीने त्यांच्याकडे आता गंभीरपणे लक्ष देण्याची वेळ आली आहे. जर त्याने इंडिया ए मालिकेतही अशीच कामगिरी कायम ठेवली, तर त्याचं टीम इंडियात पुनरागमन निश्चित दिसतंय.
हे ही वाचा -
















