Rahul Dravid contenders for England Test coach's job : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारे राहुल द्रविड आता इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता आहे. द टेलिग्राफने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, इंग्लंडच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत राहुल द्रविड यांचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या शर्यतीत त्यांच्यासोबत अँडी फ्लॉवर आणि रिचर्ड डॉसन यांसारख्या दिग्गज नावांचाही समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) ब्रँडन मॅक्क्युलम यांना कसोटी प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे.

Continues below advertisement

ब्रँडन मॅक्क्युलम हे गेल्या 4 वर्षांपासून इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इंग्लंडने बॅझबॉल आणला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ईसीबीने त्यांना कसोटी प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. मॅक्क्युलम हे केवळ एकदिवसीय आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत राहतील. पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेच्या तयारीसाठी नवीन प्रशिक्षकाला पुरेसा वेळ मिळावा, म्हणून ईसीबीने हा निर्णय घेतला आहे.

राहुल द्रविड यांचे नाव शर्यतीत सर्वात पुढे का?

Continues below advertisement

द टेलिग्राफच्या अहवालानुसार, राहुल द्रविड यांचा दांडगा अनुभव आणि कोचिंगमधील त्यांची सूक्ष्म समज पाहता, ते या पदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहेत. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये यशाची नवी शिखरे सर केली. त्यांच्याच कार्यकाळात भारत 2023 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचला आणि 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकून चॅम्पियन बनला. भारतीय क्रिकेटची मजबूत फळी तयार करण्यात द्रविड यांचा मोठा वाटा आहे.

पूर्णवेळ प्रशिक्षक बनण्यास द्रविड उत्सुक नाहीत?

अहवालात असेही म्हटले आहे की, राहुल द्रविड सध्या कोणत्याही संघाचे 'पूर्णवेळ' (Full-time) प्रशिक्षक बनण्यास फारसे उत्सुक नाहीत. परंतु, इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकाची भूमिका भारतीय संघाच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचे सामने ठराविक काळातच होतात, ज्यामुळे द्रविड यांना त्यांच्या कुटुंबासोबत घरी जास्त वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. ईसीबी (ECB) द्रविड यांच्या या अटीचा आणि इच्छेचा विचार करून त्यांना काही सवलती देण्यासही तयार असल्याचे समजते.

हे ही वाचा -

England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?