Lucknow Super Giants vs Punjab Kings IPL 2026 : पंजाब किंग्सने 'करो या मरो'च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावून संघाला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे पंजाब किंग्सचे प्लेऑफमधील आव्हान अजूनही कायम आहे. पंजाब किंग्सचे आता 14 लीग सामन्यांनंतर 15 गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट (NRR) +0.309 झाला आहे. पंजाबचा प्लेऑफमधील पुढचा प्रवास आता मुख्यत्वे राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.

Continues below advertisement

श्रेयस अय्यरने ठोकले शतक

197 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने प्रियांश आर्याला (0) बाद केले. त्यानंतर कूपर कॉनोलीही 18 धावा करून शमीचाच बळी ठरला. 22 धावांवर 2 गडी गमावल्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने अवघ्या 39 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावांची शानदार खेळी केली. त्याला अर्जुन तेंडुलकरने पायचीत केले.

Continues below advertisement

कर्णधाराला साजेशी खेळी करत श्रेयसने 51 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकत नाबाद 101 धावांची मॅचविनिंग खेळी केली. सूर्यांश शेडगेने शेवटी नाबाद 9 धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली. लखनऊकडून मोहम्मद शमीने 2 बळी घेतले, तर अर्जुन तेंडुलकरने 1 बळी मिळवला. मात्र, इतर गोलंदाजांना विकेट्स घेता आली नाही.

जोश इंग्लिसचे अर्धशतक, ऋषभ पंत नापास

तत्पूर्वी, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. लखनऊची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी शून्य धावांवर बाद झाला, तर निकोलस पूरनही (2) स्वस्तात माघारी परतला. एका बाजूने विकेट्स पडत असताना इंग्लिसने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 44 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह  72 धावा केल्या. बदोनीने अवघ्या 18 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 43 धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार पंतने २२ चेंडूंत २६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये समदने 20 चेंडूंत नाबाद 37 धावा करत लखनऊला 20 षटकांत 6 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले.

पंजाबचे प्लेऑफचे समीकरण, आता 'या' सामन्यांवर नजर

पंजाब किंग्सने आपले सर्व 14 साखळी सामने खेळले असून 15 गुणांसह ते शर्यतीत कायम आहेत. मात्र, प्लेऑफमध्ये अधिकृतपणे प्रवेश करण्यासाठी त्यांना रविवारी होणाऱ्या सामन्यांच्या निकालाची वाट पाहावी लागेल.  

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स : पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करणे अत्यंत आवश्यक आहे.

कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : जर कोलकाता नाइट राइडर्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवले, तर तो विजय खूप मोठ्या फरकाचा नसावा, जेणेकरून पंजाबचा नेट रन रेट त्यांच्यापेक्षा सरस राहील.

हे ही वाचा -

RCB Jacob Bethell IPL 2026 : क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?