T20 World Cup 2026 Australia Squad Marathi News : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बेन ड्वारशुइस याला संघात संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकासाठी आपला अंतिम संघ जाहीर केला असून, त्यात पॅट कमिन्ससह एकूण 2 बदल करण्यात आले आहेत.
खरं तर, पॅट कमिन्सला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिका 2025-26 मधील एका सामन्यात तो खेळला होता, मात्र त्याची दुखापत पुन्हा बळावली. त्यामुळे त्याला टी-20 विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे. याशिवाय मॅथ्यू शॉर्ट यालाही ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी मॅट रेनशॉ याची संघात निवड करण्यात आली आहे.
जोश हेजलवूड फिट घोषित
टी-20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तसेच टिम डेव्हिड आणि नाथन एलिस यांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. यापूर्वी टिम डेव्हिड आणि नाथन एलिस विश्वचषकापूर्वी फिट होणार नाहीत, अशी चर्चा होती. टिम डेव्हिडने बिग बॅश लीगमधील अनेक सामने विश्रांतीसाठी खेळले नव्हते, तसेच तो पाकिस्तान दौऱ्यावरही सहभागी झाला नव्हता.
स्टीव्ह स्मिथला संघात स्थान नाही
टी-20 विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात एक मोठे नाव अनुपस्थित आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला संघात स्थान देण्यात आलेले नाही. सिडनी सिक्सर्सकडून खेळताना स्मिथने शानदार प्रदर्शन केले होते, मात्र तरीही त्याला टी-20 विश्वचषकात संधी मिळालेली नाही.
हे ही वाचा -
