PAK vs WI : मोहम्मद रिझवान आणि हैदर अलीच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट विंडिजचा दारुण पराभव केलाय. कराची येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट विंडिजचा 63 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या वेस्ट विंडिजचा डाव 19 षटकांत फक्त 137 धावांत संपुष्टात आला. 


प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने मोहम्मद रिझवान 78 आणि हैदर अलीच्या 68 धावांच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या बळावर 200 धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद रिझवान याने 52 चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. तर हैदर अलीने चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 39 चेंडत 68 धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय अखेरच्या षटकात मोहम्मद नवाज याने 10 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. फखार जमान आणि असिफ अली यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वेस्ट विंडिजकडून रोमिरिओ शेफर्ड याने सर्वाधिक दोन बळी घेतले. अकेल हुसेन, ओशेन थॉमस आणि स्मिथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


पाकिस्तानने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट विंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर सलामीवीर फलंदाज ब्रँडोन किंग बाद झाला. शाय होप आणि निकोलस पुरन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. शाय होपने 31 धावांची तर पुरन याने 18 धावांची खेळी केली. याशिवाय कायरॉन पॉवेल याने 23 धावांची खेळी केली. शाय होपचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडचा आला नाही. शाय होप यानेही संथ फलंदाजी केली. होपने 31 धावांसाठी 27 चेंडू खर्च केले. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम याने सर्वाधिक चार बळी घेतले. तर शादाब खान याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाज आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.