PCB Seizes Players Phones Ahead of England Test : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) घेतलेल्या काही निर्णयांमुळे आधीच क्रिकेटविश्वात चर्चा रंगली असताना आता इंग्लंड दौऱ्यावरून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी राष्ट्रीय संघातील खेळाडूंचे मोबाइल फोन पीसीबीने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. पाकिस्तानी पत्रकार अंबर अली यांनी याबाबत दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना संपेपर्यंत पाकिस्तानी खेळाडूंचे मोबाइल फोन पीसीबीच्या ताब्यात राहणार आहेत. मात्र, बोर्डाने नेमक्या कोणत्या खेळाडूंचे फोन घेतले आहेत किंवा संपूर्ण संघातील सर्वच खेळाडूंचे मोबाइल जमा करून घेतले आहेत का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Continues below advertisement

पीसीबीने अचानक खेळाडूंचे फोन का घेतले?

सर्वात मोठा प्रश्न याचाच आहे. पीसीबीने एवढं मोठं पाऊल नेमकं का उचललं? बोर्डाला कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची किंवा मॅच फिक्सिंगची माहिती मिळाली आहे का? एखाद्या खेळाडूच्या फोनमधील संभाषण किंवा माहितीची चौकशी सुरू आहे का? की हा केवळ सुरक्षेचा आणि भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. पीसीबीनेही अधिकृतपणे खेळाडूंचे मोबाइल फोन ताब्यात घेण्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे.

Continues below advertisement

मॅच फिक्सिंगशी संबंध आहे का?

खेळाडूंचे मोबाइल फोन ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर साहजिकच मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या पीसीबीने कोणत्याही खेळाडूवर मॅच फिक्सिंग किंवा भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. त्यामुळे केवळ फोन ताब्यात घेतल्याच्या बातमीवरून मॅच फिक्सिंगचा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पीसीबीकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच या कारवाईमागचं खरं कारण स्पष्ट होऊ शकतं.

ICCच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांमध्ये काय आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मोबाइल फोन आणि इतर कम्युनिकेशन डिव्हाइसच्या वापराबाबत कडक नियम आहेत. सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूमसारख्या काही प्रतिबंधित भागांमध्ये मोबाइल फोन किंवा इतर कम्युनिकेशन डिव्हाइसच्या वापरावर निर्बंध असतात. या नियमांचा मुख्य उद्देश मैदानावरील गोपनीय माहितीचा गैरवापर रोखणे, बाहेरील व्यक्तींशी अनधिकृत संपर्क टाळणे आणि भ्रष्टाचार किंवा मॅच फिक्सिंगच्या शक्यता कमी करणे हा आहे. मात्र, पीसीबीने संपूर्ण दौऱ्यादरम्यान खेळाडूंचे फोन आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या नेहमीच्या सामन्यादरम्यानच्या मोबाइल निर्बंधांपेक्षा वेगळी बाब आहे.

हे ही वाचा -

Fatima Sana - Shafali Verma : चल निघ येथून...! भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा; शेफालीच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने नको ते केलं, नेमकं काय घडलं? VIDEO