Pakistan Cricket News : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघातील सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवल्यानंतर आता निवड समितीवरही कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ खेळाडू मोहम्मद रिजवान, इमाम-उल-हक आणि सलमान अली आगा यांना इंग्लंडमधून परत पाठवण्यात आल्यानंतर या निर्णयामागचं नेमकं कारण काय, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Continues below advertisement

खराब फॉर्मसोबत ड्रेसिंग रूममधील वर्तनाचाही मुद्दा?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, PCB च्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, रिजवान आणि इमाम यांना केवळ खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर करण्यात आलेलं नाही. ड्रेसिंग रूममधील त्यांच्या वर्तनाबाबतही बोर्ड नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. रिजवान, इमाम आणि सलमान अली आगा यांना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यादरम्यान घडलेल्या काही घटनांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी समितीसमोर हजर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं.

Continues below advertisement

आता आकिब जावेदही PCB च्या रडारवर?

पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आणि वरिष्ठ निवडकर्ता आकिब जावेद यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यांना राष्ट्रीय निवड समितीतील जबाबदारीतून हटवून लाहोर हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये डायरेक्टर डेव्हलपमेंट म्हणून कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं जाऊ शकतं. आकिब जावेद हे PCB मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत बदल झाल्यास पाकिस्तान क्रिकेटमधील हा आणखी एक मोठा निर्णय ठरू शकतो.

दरम्यान, उर्वरित खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय अंतरिम रेड-बॉल हेड कोच माईक हेसन यांच्या सल्ल्याने घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. हेसन यांना व्हाइट-बॉल कॅम्पमध्ये काम केलेल्या काही खेळाडूंना आजमावण्याची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

निवड समितीतील सदस्यांनाही नोटीस

PCB ने निवड समिती आणि सल्लागार समितीच्या सदस्यांनाही नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी इमाम आणि रिजवान यांची निवड नेमक्या कोणत्या निकषांवर करण्यात आली, तसेच निवड धोरण ठरवताना कोणते निकष वापरण्यात आले, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांनीही निवड समितीच्या पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर नवी निवड समिती?

PCB अध्यक्ष मोहसिन नकवी पाकिस्तान क्रिकेटमधील व्यवस्था ‘साफ-सुथरी’ करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे इंग्लंड दौरा संपल्यानंतर नव्या निवड समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये आता निवड प्रक्रियेतही मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, माईक हेसन यांच्याबाबतही PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हेसन यांनी रेड-बॉल संघाच्या कायमस्वरूपी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना हे पद देण्याचा बोर्ड विचार करू शकतो.

हे ही वाचा -

IND vs PAK LIVE : पैसे खर्च करण्याची गरज नाही! भारत-पाकिस्तानचा थरारक सामना फ्रीमध्ये कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर