Babar Azam Stats & Records : आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नेपाळपुढे विराट लक्ष ठेवले. नाणेफेक जिंकून बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 342 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली. तर इफ्तिखार अहमद याने 71 चेंडूत नाबाद 109 धावा चोपल्या. आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात दीड शतकी खेळी करत बाबर आझम याने नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीला मागे टाकत बाबर याने नवीन विक्रम केला आहे. त्याशिवाय, आशिया चषकात 151 धावांची खेळी करणारा बाबर आझम पहिलाच कर्णधार ठरलाय. 






पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर मोठा विक्रम - 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नवा विक्रम केला आहे. नेपाळच्या विरोधात बाबर याने 19 वनडे शतक ठकले.. फक्त 102 डावात बाबरने 19 वे शतक ठोकले. सर्वात कमी डावात 19 शतके ठोकण्याचा रेकॉर्ड बाबरने आपल्या नावावर केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हाशिम आमला आहे, हाशिम आमला याने 104 डावात 19 शतके ठोकली होती. तर विराट कोहलीला यासाठी 124 डाव लागले होते.  


सर्वात वेगवान 19 शतके ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये भारताचा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली याने 124 डावात 19 शतके ठोकली आहे. विराट कोहलीनंतर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरचा क्रमांक लागतो. वॉर्नरने 139 डावात 19 शतके ठोकली आहे. एबी डिव्हिलिअर्स पाचव्या क्रमांकावर आहे, त्याने 171 डावात 19 शतके ठोकली आहे. बाबर आझम याने विराट कोहली, हाशीम आमला यासारख्या दिग्गजांचा विक्रम मोडला आहे. 






विराट कोहलीचा हा विक्रम कायम -


बाबर आझम याने 151 धावांची खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण विराट कोहलीचा वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम कायम आहे. विराट कोहलीने  2012 मध्ये पाकिस्तानविरोधातच 183 धावांची खेळी केली होती. ही आशिया चषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आशिया चषकात बाबर आझम याची खेळी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम याने युनिस खान याचा विक्रम मोडला आहे. युनिस खान याने 2004 मध्ये हाँगकाँगविरोधात 144 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय  बांगलादेशच्या एम रहमान याने 2018 मध्ये श्रीलंकाविरोधात 144 धावांची खेळी केली.