Cameron Green angry Usman Tariq : सध्या पाकिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दोन सामने आतापर्यंत झाले आहेत. मात्र दुसऱ्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या एका गोलंदाजीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा गोलंदाजी अ‍ॅक्शनबाबत चर्चा सुरू झाली आहे.  

Continues below advertisement

खरंतर, पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिक याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन याने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बाद झाल्यानंतर तारिकच्या अ‍ॅक्शनकडे इशारा करत नाराजी व्यक्त केली. ग्रीन चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता, मात्र तारिकच्या चेंडूवर तो बाद झाला. शादाब खानकडे झेल देत ग्रीनने 20 चेंडूमध्ये 35 धावा केल्या आणि माघारी परतला.

पॅव्हेलियनकडे जात असताना ब्रॉडकास्ट कॅमेऱ्यांनी ग्रीनचा एक ठराविक इशारा टिपला. सोशल मीडियावर या इशाऱ्याचा अर्थ चकिंग म्हणजेच बेकायदेशीर गोलंदाजी अ‍ॅक्शन असा लावला जात आहे. या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काही पाकिस्तानी चाहत्यांनी तारिकच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, ग्रीन आपला विकेट गमावल्यामुळे नाराज होता आणि तारिकच्या गोलंदाजीचा अंदाज त्याला घेता आला नाही, म्हणूनच त्याने तक्रार केली.

याआधीही वाद, पण क्लीन चिट मिळालेली 

ही पहिलीच वेळ नाही की उस्मान तारिकच्या अ‍ॅक्शनवर शंका उपस्थित झाली आहे. याआधी पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या नवव्या आणि दहाव्या हंगामातही त्याच्या अ‍ॅक्शनबाबत प्रश्न विचारले गेले होते. मात्र, दोन्ही वेळा तारिकने PCB-मान्य बायोमेकॅनिक्स लॅबमध्ये अधिकृत चाचण्या दिल्या आणि त्याला क्लीन चिट मिळाली. त्याचा अ‍ॅक्शन पूर्णपणे कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे. 30 वर्षीय तारिकने याआधीही स्पष्ट केलं होतं की, त्याच्या कोपराचा वाकण्याचा कोन आयसीसीने ठरवलेल्या 15 अंशांच्या मर्यादेतच आहे. पाकिस्तानमध्ये त्याने दोन वेळा अधिकृत चाचण्या उत्तीर्ण केल्याचंही त्याने सांगितलं.

पाकिस्तानचा दणदणीत विजय

या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत अजेय आघाडी घेतली. सलमान अली आघाने 40 चेंडूमध्ये 76 धावांची शानदार खेळी करत संघाला 20 षटकांत 198 धावांपर्यंत पोहोचवलं. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 108 धावांत सर्वबाद झाला आणि 90 धावांनी सामना गमावला. अबरार अहमद आणि शादाब खान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर उस्मान तारिकने एक बळी मिळवला.

हे ही वाचा -

Suryakumar Yadav : टीकेला पूर्णविराम; सूर्यकुमार यादव ठरला प्लेअर ऑफ द सिरीज; सामना संपल्यानंतर सगळा राग काढला, म्हणाला...