Pakistan T20 World Cup 2026 : भारताच्या पराभवाचा राग पाकिस्तानने लिंबूटिंबू टीमवर काढला; मिळवला सर्वात मोठा विजय, थेट सुपर-8 मध्ये मारली एन्ट्री
Pakistan beat Namibia by 102 runs : पाकिस्तानने लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात नामिबियावर तब्बल 102 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Pakistan Qualify Super-8 T20 World Cup 2026 : पाकिस्तानने लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात नामिबियावर तब्बल 102 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि सुपर-8मध्ये प्रवेश करणारा शेवटचा संघ ठरला. या विजयासह पाकिस्तानने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट पात्रताही मिळवली. या सामन्याचा खरा नायक साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) ठरला. त्याने 58 चेंडूत नाबाद 100 धावांची झंझावाती खेळी करत पाकिस्तानला 3 बाद 199 धावांपर्यंत नेले. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 षटकार ठोकले. विशेष म्हणजे 50 वरून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने फक्त 20 चेंडू घेतले. विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी 2014 मध्ये अहमद शहजाद याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते.
Pakistan seal the final #T20WorldCup Super 8 spot with a solid victory over Namibia 👊
— ICC (@ICC) February 18, 2026
📝: https://t.co/ig0UhhTcFP pic.twitter.com/XnqUAqOTvK
भारताच्या पराभवाचा राग लिंबूटिंबू टीमवर काढला...
रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. कर्णधार सलमान आगा (38) आणि फरहान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर फरहान आणि शादाब खान (नाबाद 36) यांनी 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
Pakistan's Sahibzada Farhan took the game away from Namibia with a superb hundred👌
— ICC (@ICC) February 18, 2026
He wins the @aramco POTM🏅
📝: https://t.co/ig0UhhTKvn pic.twitter.com/cJCB9Nm0z0
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात सावध होती. साइम अयूब (14) बाद झाल्यानंतर पॉवरप्लेमध्ये केवळ 47 धावा झाल्या. मात्र नवव्या षटकात सलमान आगाने विलेम मायबर्गच्या गोलंदाजीवर सलग षटकार ठोकत गती वाढवली. त्यानंतर फरहाननेही लेग-स्पिनरवर आक्रमक फटकेबाजी करत डावाला वेग दिला.
एका षटकात तीन षटकार ठोकत पाकिस्तानने धावगती वाढवली. सलमान बाद झाल्यानंतरही फरहानने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ साधत नामिबियाच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला आणि शतक पूर्ण केले. अखेरीस शादाब खानने शेवटच्या षटकांत दोन षटकार ठोकत 199 धावांचा भक्कम आकडा उभा केला.
नामिबियाची निराशाजनक फलंदाजी
200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. पाकिस्तानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 97 धावांत गारद झाला आणि पाकिस्तानने 102 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह पाकिस्तानने केवळ सुपर-8चे तिकीट पक्के केले नाही, तर टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिले. आता सुपर-8मध्ये त्यांची कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -





















