PAK vs ENG 3rd T20 Highlights: हॅरी ब्रुक (Harry Brook) आणि बेन डकेट (Ben Duckett) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघानं तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा (England Beats Pakistan) 63 धावांनी धुव्वा उडवला.  कराची येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानसमोर 221 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला अवघ्या 158 धावांवर रोखलं. या विजयासह इंग्लंडच्या संघानं सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलीय. 


हॅरी ब्रुक- बेन डकेटची आक्रमक खेळी
या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं पहिली विकेट लवकर गमावली. फिल सॉल्ट (8) मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, याचा परिणाम इंग्लंडच्या धावगतीवर झाला नाही. डेव्हिड मलान (14) आणि विल जॅक (40) बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बेन डकेटनं संघाचा डाव सावरत तुफानी फलंदाजी केली. हॅरी ब्रुकनं 35 चेंडूत 81 धावा आणि बेन डकटनं 42 चेंडूत 70 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 चेंडूत 139 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीमुळं इंग्लंडनं 20 षटकात तीन विकेट्स गमावून 221 धावा केल्या.


पाकिस्तानच्या संघाची निराशाजनक कामगिरी
इंग्लंडनं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची खराब सुरूवात झाली. अवघ्या 28 धावांवर पाकिस्तानच्या संघानं चार विकेट्स गमावल्या. . मोहम्मद रिझवान (8 धावा), बाबर आझम (8 धावा), हैदर अली (3 धावा) आणि इफ्तिखार अहमद (6 धावा) यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. पाकिस्तानकडून शान मसुदनं सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. पाकिस्तानच्या संघाला 20 षटकांत 158 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून मार्क वूडनं सर्वाधिक तीन आणि आदिल रशीदनं दोन विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-