England tour of Pakistan: मुल्तानमध्ये (Multan) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Pakistan vs England) पराभव करून इतिहास रचला. या विजयासह इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर 2-0 असा कब्जा केला. मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, या सामन्याच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक घडलं की, इंग्लंडनं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं आणि काही वेळातच सामना जिंकला. इंग्लंडनं दिलेल्या 355 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 328 धावांवर ऑलआऊट झाला. 


पहिल्या डावात 79 धावांची आघाडी मिळविल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 275 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला 355 धावांचं लक्ष्य मिळालं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना इमाम-उल-हक जखमी झाल्यानं मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी पाकिस्तानसाठी डावाची सुरुवात केली. रिझवान आणि शफीक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. पण पाकिस्तानचा संघ 66 धावांवर असताना मोहम्मद रिझवान बाद झाला. यानंतर काही वेळातच कर्णधार बाबर आझमची विकेट गेली. बाबरला एकच धाव करता आली. शफिकच्या रुपात (45 धावा) पाकिस्तानच्या संघानं तिसरी विकेट गमावली.


ट्वीट-






 


इंग्लंडचं जबरदस्त कमबॅक
अवघ्या 83 धावांत तीन विकेट गमावल्यानं पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. यानंतर जखमी इमाम-उल-हक आणि सौद शकील यांनी चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. मात्र, इमाम 60 धावांवर बाद झाला. चौथ्या दिवशी सौद आणि फहीम अश्रफ फलंदाजीला आले. दोघांनी पहिला अर्धा तास विकेट पडू दिली नाही. मात्र, जो रूटनं फहीमला (10 धावा) बाद करून सामना इंग्लंडच्या बाजूनं झुकवला. सौद आणि अष्टपैलू मोहम्मद नवाज यांच्यात 80 धावांची भागीदारी झाली. पाकिस्ताननं पाच विकेट्स गमावून 290 धावा केल्या. तेव्हा पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पण इंग्लंडनं जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 328 धावांवर ऑलआऊट केलं.  इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मार्क वूडनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर, जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. याशिवाय, जॅक लीच आणि जो रूट यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली.


हे देखील वाचा-