New Zealand T20I squad against Pakistan : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे किवी संघाचे 25 वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर न्यूझीलंड संघात मोठे बदल दिसून आले आहेत. खरंतर, न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किवी संघाची धुरा मिशेल सँटनरऐवजी मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी सँटनर उपलब्ध नाही. सँटनर व्यतिरिक्त, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र सारखे अनेक स्टार खेळाडू देखील या संघाचा भाग नाहीत.
संघातून स्टार खेळाडू गायब
डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स आणि रचिन रवींद्र हे पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. तर केन विल्यमसनने देखील स्वतःला अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसतील. आयपीएल 2025 चा थरार येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. केन विल्यमसन पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेणार आहे. पीएसएल 2025 पुढील महिन्याच्या 11 तारखेपासून खेळवले जाईल.
श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत खेळू न शकलेला ईश सोधी संघात परतला आहे. त्याच वेळी, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतून बाहेर पडल्यानंतर बेन सीयर्सनेही पुनरागमन केले आहे. काइल जेमीसन आणि विल ओ'रोर्क हे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध आहेत.
दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात खेळू न शकलेला आणि स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेला मॅट हेन्रीची टी-20 मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी निवड झाली आहे. पण, त्यापूर्वी त्याला फिटनेस चाचणी द्यावी लागेल. फिन अॅलन, जिमी नीशम आणि टिम सेफर्ट यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला टी20 सामना: रविवार, 16 मार्च, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्चदुसरा टी20 सामना: मंगळवार, 18 मार्च, ओटागो विद्यापीठ, ड्युनेडिनतिसरा टी20 सामना: शुक्रवार, 21 मार्च, ईडन पार्क, ऑकलंडचौथा टी20 सामना: रविवार, 23 मार्च, बे ओव्हल, माउंट माउंगानुईपाचवा टी20 सामना: बुधवार, 25 मार्च, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन अॅलन, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ'रोर्क, टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.
