मुंबई, १३ जून २०२५ : सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने गुरुवारी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भव्य अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्सला पाच विकेट्सने पराभव करून टी-२० मुंबई लीग २०२५ चा ट्रॉफी नावावर केली.
सोबो मुंबई फाल्कन्सने सुरुवातीच्या अडचणींवर मात करत मयुरेश तांडेलच्या नाबाद ५० धावांच्या संयमी खेळीच्या आणि हर्ष आघावच्या आक्रमक नाबाद ४५ धावांच्या जोरावर ४ बाद १५७ धावांचा सन्मानजनक पल्ला उभा केला.
प्रत्युत्तरात एमएससी मराठा रॉयल्ससाठी लक्ष्याचा पाठलाग करताना चिन्मय सुतार (५३), साहिल जाधव (२२), सचिन यादव (१९) आणि स्फोटक अवैस खान (३८) यांच्या मौल्यवान खेळीच्या जोरावर विजय मिळवला. कर्णधार सिद्धेश लाड (१५) आणि साहिल यांनी ३२ धावांची जलद सलामी भागीदारी करत रॉयल्सना स्थिर सुरुवात करून दिली. त्यानंतर ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या चिन्मयने सूत्रे हाती घेतली आणि सचिन यादवसोबत ४१ धावांची भागीदारी आणि त्यानंतर अवैस खानसोबत ६३ धावांची भागीदारी करून रॉयल्सना धावांचा पाठलाग करताना चांगली पकड मिळवून दिली.
तथापि, १० चेंडूत फक्त आठ धावा हव्या असताना, डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिक मिश्राने एका नाट्यमय शेवटच्या षटकात फाल्कन्सला पुन्हा स्पर्धेत आणले. त्याने अवैस आणि चिन्मय दोघांनाही बाद करून सामन्याला कलाटणी दिली. परंतु शेवटच्या षटकात सात धावांची गरज असताना, रोहन राजेने आपला संयम राखला. पहिल्या चेंडूत चौकार मारला आणि चार चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले. यामुळे रॉयल्सना तणावपूर्ण पण चांगला विजय मिळाला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले गेले, फाल्कन्सला सुरुवातीची लय सापडली नाही, त्यांनी दोन्ही सलामीवीर - अंगकृष रघुवंशी (७) आणि इशान मुलचंदानी (२०) फक्त ३३ धावांवर माघारी परतले. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि अमोघ भटकल (१६) देखील लवकर बाद झाले. डावखुरा फिरकी गोलंदाज वैभव माली याने फाल्कन्सला धक्के दिले. त्याने रघुवंशी व अय्यर अशा महत्त्वाच्या विकेट मिळवल्या.
१२ षटकांनंतर ७२/४ अशा धावसंख्येवर संघर्ष करत असताना, मयुरेश आणि हर्ष यांनी पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. त्यांच्या अखंड भागीदारीने केवळ डाव स्थिरावला नाही तर अंतिम सामन्याच्या दुसऱ्या सत्रात संघाला महत्त्वपूर्ण गती दिली.
सोबो मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी संध्याकाळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह, अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघातातील बळींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळले गेले. वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी, मोठ्या स्क्रीनवर शोक संदेश प्रदर्शित करण्यात आला आणि सर्व खेळाडू दंडावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले.
स्क्रीनवर संदेश होता : “आजच्या अपघातातील बळींसोबत आमच्या प्रार्थना आहेत. शांततेत आणि एकजुटीने त्यांचे स्मरण करत आहोत.”
संक्षिप्त धावफलक : सोबो मुंबई फाल्कन्स १५७/४ (मयुरेश तांडेल ५० नाबाद, हर्ष आघाव ४५ नाबाद; वैभव माळी २/३२) पराभूत वि. एमएससी मराठा रॉयल्स १५८/५ (चिन्मय सुतार ५३, अवैस खान ३८; कार्तिक मिश्रा २/३३).
