Mumbai vs Punjab VHT 2025-26 जयपूर: विजय हजारे ट्रॉफीत पंजाबनं मुंबईला एक रननं पराभूत केलं आहे. सरफराज खान, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यांच्या सारखे स्टार खेळाडू असले तरी मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या संघाला 217 धावांचं आव्हान पार करता आलं नाही. जयपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये अभिषेक शर्माच्या टीमनं पहिल्यांदा 216 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 215 धावांवर बाद झाला.
पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 216 धावा केल्या होत्या. कॅप्टन अभिषेक शर्मा 8 धावा करुन बाद झाला. आयपीएल स्टार प्रभसिमरन सिंग देखील 11 धावा करुन बाद झाला. अनमोलप्रीत सिंहनं 57 धावा केल्या तर रमनदीप सिंग यानं 72 धावांची खेळी करत पंजाबला 200 च्या पार पोहोचवलं.
रोमांचक सामन्यात मुंबईचा पराभव
मुंबईच्या डावाची सुरुवात अंगकृष रघुवंशी आणि मुशीर खान या दोघांनी केली. मुशीर खान 21 धावा आणि अंगकृष रघुवंशी यानं 23 धावा केल्या. सरफराज खान यानं पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. विजय हजारे ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक होण्याचा विक्रम सरफराच खान यानं त्याच्या नावावर केला. त्यानं 20 बॉलमध्ये 62 धावा केल्या. त्यानं 7 चौकार आणि 5 षटकार मारले.
मुंबईचे स्टार अपयशी
मुंबईचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं मागील सामन्यात 82 धावांची दमदार खेळी केली होती. यावेळी देखील त्यानं चांगली सुरुवात केली होती. त्यानं 34 बॉलमध्ये 45 धावा केल्या होत्या. दुसरीकडे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोघेही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव 15 धावा आणि शिवम दुबे 12 धावा करुन बाद झाला.
14 धावांमध्ये 5 विकेट गमावल्या
मुंबईची अवस्था 5 विकेट 201 धावा होती. मॅचमध्ये 27 ओव्हर बाकी होत्या, दरम्यान मुंबईला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना त्या धावा करुन दिल्या नाहीत. मुंबईनं 14 धावांमध्ये 5 विकेट गमावल्या. यामुळं मुंबईचा डाव 215 धावांवर आटोपला, यामुळं मुंबईचा एका रननं पराभव झाला.
