Tilak Varma County Championship News :मुंबई इंडियन्सचा स्टार युवा फलंदाज आणि रोहित शर्माचा लाडका म्हणून ओळखला जाणारा तिलक वर्मा देखील इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. ताज्या माहितीनुसार, त्याने हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबत 2 महिन्यांसाठी डील केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) ने त्याला एनओसी दिले आहे. हॅम्पशायर कडून खेळण्याचा निर्णय हा त्याच्या कारकिर्दीसाठी एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने केली पुष्टी...
एचसीएने एका निवेदनात म्हटले आहे की, "हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला हे कळवण्यास आनंद होत आहे की हैदराबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू तिलक वर्मा याला यूके काउंटी चॅम्पियनशिप लीगमध्ये खेळण्यासाठी हॅम्पशायर काउंटी संघाने संपर्क साधला आहे. एचसीए त्याला हॅम्पशायर काउंटीकडून खेळण्यासाठी शुभेच्छा देतो." क्रिकबझच्या मते, तो 18 जून ते 2 ऑगस्ट दरम्यान इंग्लिश काउंटीकडून खेळेल, ज्या दरम्यान तो सुरुवातीला 4 चार दिवसांच्या सामन्यांमध्ये भाग घेईल.
तिलकची प्रथम श्रेणी कारकीर्द
तिलकने आतापर्यंत त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 18 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 50.16 च्या उत्कृष्ट सरासरीने 1,204 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 5 शतके आणि 4 अर्धशतके ठोकली. दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या 121 धावा आहे. त्याच्या लिस्ट-ए कारकिर्दीत, त्याने 36 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 78.19 च्या सरासरीने 1,494 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 5 शतके देखील केली आहेत.
भारतासाठी तिलकची एकदिवसीय आणि टी-20 कारकीर्द
तिलकने भारतासाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने भारतासाठी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 22.66 च्या सरासरीने 68 धावा केल्या आहेत. 22 वर्षीय या फलंदाजाने 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 24 डावांमध्ये 49.93 च्या सरासरीने 749 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतकेही झळकावली आहेत.
ऋतुराज गायकवाडने पण 'या' संघासोबत केला करार
तिळकपूर्वी ऋतुराज गायकवाड याने नुकताच यॉर्कशायर संघासोबत करार केला होता. गायकवाड या क्लबमध्ये सामील होणारा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा आणि युवराज सिंग यांनी या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत, त्याने 38 सामन्यांच्या 65 डावांमध्ये 41.77 च्या सरासरीने 2,632 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 7 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.
हे ही वाचा -
