Mumbai Indians IPL News : आयपीएल 2026 च्या हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएल हंगामासाठी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारपदासाठी दोन नावं चर्चेत असून, या निर्णयाच्या प्रक्रियेत माजी कर्णधार रोहित शर्माचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करणार का, अशी चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, रोहितला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स नव्या चेहऱ्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. मात्र, सध्या तिलक वर्माच्या नावाचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे
हार्दिक पांड्याचे काय होणार?
2026 च्या खराब हंगामानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समधून ट्रेड केलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक फ्रँचायझींनी त्याच्यामध्ये रस दाखवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप ट्रेडबाबत कोणतीही ठोस घडामोड झालेली नाही. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससोबतही याबाबत काही चर्चा केल्याची माहिती आहे. कॅमेरून ग्रीनचं नाव संभाव्य ट्रेडमध्ये समोर आलं होतं. मात्र, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त कसोटी वेळापत्रकामुळे त्याच्या वर्कलोडबाबत मुंबईच्या टीम मॅनेजमेंटला चिंता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याऐवजी खेळाडू म्हणून संघात कायम ठेवण्याची शक्यता अधिक असल्याचं समोर आलं आहे. मुंबई इंडियन्सला मात्र नव्या कर्णधारासह संघाला नवी दिशा द्यायची आहे.
माहेला जयवर्धने यांच्यावर पुन्हा विश्वास
कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता असली तरी मुख्य प्रशिक्षकाच्या बाबतीत मुंबई इंडियन्स सातत्य राखण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने 2027 च्या हंगामातही ही जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये जयवर्धनेने 2+1 वर्षांच्या करारावर मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं होतं. त्यामुळे सध्याच्या कराराच्या चक्रातील शेवटच्या वर्षासाठी त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने 2025 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2026 मध्ये संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आणि मुंबईला केवळ चार सामने जिंकता आले.
सूर्यावर 'वन फॅमिली'चा भरवसा
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबतही चर्चा सुरू होती. नुकतंच त्याचं टीम इंडियाच्या टी20 कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि आयपीएल 2026 मधील त्याची कामगिरी यामुळे मुंबई इंडियन्स त्याच्यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवला सोडण्याचा कोणताही इरादा नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. एका खराब हंगामाच्या आधारावर अनुभवी खेळाडूला संघातून बाहेर करण्याची मुंबईची पद्धत नसल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा -
