Mumbai Indians appoints Zubin Bharucha as Director of Performance : हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स (MI) यांचे नाते आता संपुष्टात येणार असल्याच्या बातम्यांनी सध्या क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. अद्याप या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी आयपीएलच्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आगामी हंगामापूर्वी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशामध्ये आणि युवा खेळाडूंना घडवण्यात मोलाचा वाटा उचलणारे दिग्गज झुबीन भरुचा (Zubin Bharucha) आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने भरुचा यांच्यावर डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काय असेल झुबीन भरुचा यांची भूमिका? (Zubin Bharucha joins Mumbai Indians)
झुबीन भरुचा हे मुंबई इंडियन्सच्या अस्तित्वात असलेल्या जागतिक क्रिकेट इकोसिस्टममधील बहुविद्याशाखीय नेतृत्व गटासोबत जवळून काम करतील. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होऊन, खेळाडूंच्या कौशल्याचा विकास करणे आणि त्यांच्या कामगिरीत सातत्य राखण्याच्या फ्रँचायझीच्या परंपरेला ते अधिक मजबूत करतील.
मुंबई क्रिकेटमधील 2 दशकांचा दांडगा अनुभव
झुबीन भरुचा यांचे मुंबई इंडियन्समध्ये आगमन म्हणजे एका अर्थाने त्यांची घरवापसी मानली जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशासन सांभाळण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. भरुचा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे सलामीवीर म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ते 1993-94 च्या रणजी ट्रॉफी आणि 1994-95 च्या इराणी कप विजेत्या ऐतिहासिक मुंबई संघाचे महत्त्वाचे सदस्य होते.
तब्बल 17 वर्षे राजस्थान रॉयल्सशी खास नात
तब्बल 17 वर्षे त्यांनी राजस्थान रॉयल्सचे टीम डायरेक्टर आणि क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख म्हणून काम पाहिले. आरआरच्या सुरुवातीच्या विजेतेपदापासून ते युवा खेळाडूंना शोधण्यापर्यंत त्यांचा यात मोठा वाटा होता. तसेच दिल्ली फ्रँचायझीसोबत त्यांनी टेक्निकल डायरेक्टर म्हणूनही आपली सेवा दिली आहे. राजस्थान रॉयल्समध्ये काम करताना त्यांनी यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांसारख्या अनेक नवोदित खेळाडूंना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबई इंडियन्ससाठी का महत्त्वाचा आहे हा निर्णय?
मुंबई इंडियन्स हा संघ नेहमीच नवोदित आणि तरुण टॅलेंटला शोधून त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू बनवण्यासाठी ओळखला जातो. झुबीन भरुचा यांचा खेळाडूंच्या तांत्रिक आणि मानसिक विकासातील दांडगा अनुभव मुंबई इंडियन्ससाठी मैलाचा दगड ठरू शकतो. राजस्थान रॉयल्समधील त्यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात त्यांच्या येण्याने संघाची 'प्लेअर डेव्हलपमेंट' सिस्टीम अधिक मजबूत आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा -
