England vs India 3rd Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघासाठी खूप चांगली झाली, कारण मोहम्मद सिराजने दिवसाच्या पाचव्या षटकात बेन डकेटची विकेट घेतली. डकेटची विकेट घेतल्यानंतर सिराजने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले, ती प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
मोहम्मद सिराजने बेन डकेटची केली शिकार
ही घटना इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली, जेव्हा सिराज गोलंदाजी करत होता. डकेटने या षटकातील पाचवा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मिड-ऑनच्या दिशेने हवेत गेला आणि जसप्रीत बुमराहने तो झेलला. बुमराहने झेल पकडताच सिराज रागाने पूर्णपणे लाल झाला आणि डकेटच्या चेहऱ्यापासून थोडे दूर ओरडून सेलिब्रेशन करताना दिसला. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सामना एका रोमांचक वळणावर
जल्लोष करताना मोहम्मद सिराजचा खांदा बेन डकेटला थोडासा लागला. त्यानंतर सिराजच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आक्रमक देहबोली पाहून पंचांनी त्याला एक प्रकारे समज दिली. मात्र, या संपूर्ण प्रसंगातून हे स्पष्ट झाले की, लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोन्ही संघांमध्ये एक वेगळाच जोश आणि तणाव निर्माण झाला आहे, आता पुढचा खेळ अधिकच रंगतदार आणि रोमहर्षक होणार हे नक्की. भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डावही 387 धावांवर आऊट झाला होता.
तिसऱ्या दिवशी वाद का झाला?
भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वातावरण तापले आणि भारतीय खेळाडू जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्याशी भिडले. ही घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकात घडली. खरंतर, दिवसाचा खेळ संपण्याच्या बेतात असताना इंग्लंडचा डाव सुरू झाला. अशा परिस्थितीत इंग्लंडचे फलंदाज कोणतेही योग्य कारण नसताना वेळ वाया घालवत होते. बुमराहने चेंडू टाकल्यानंतर, क्रॉलीने बोटाच्या दुखापतीचे कारण देत फिजिओला मैदानावर बोलावले. यामुळे गिलसह संपूर्ण भारतीय संघाने त्याला फटकारले आणि सर्व खेळाडू टाळ्या वाजवताना दिसले. यादरम्यान क्रॉली आणि गिलमध्ये जोरदार वाद झाला. त्याच वेळी, सिराजसह इतर भारतीय खेळाडूही संतप्त दिसत होते.