Pakistan Cricket Ruin News : एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये ज्या संघाचा दबदबा होता आणि ज्यांच्याशी खेळायला बडे बडे संघ घाबरायचे, तो पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) आज पूर्णपणे रसातळाला गेला आहे. सध्याच्या काळात नवखे आणि कमजोर संघही पाकिस्तानला धुळ चारत आहेत. पाकिस्तान क्रिकेटच्या या दारुण आणि लाजीरवाण्या अवस्थेवर आता माजी दिग्गज फलंदाज मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) याने अश्रू ढाळले आहेत. 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर मिळवलेला 10 विकेट्सचा विजयच पाकिस्तान क्रिकेटच्या विनाशाचे मुख्य कारण ठरला, असा खळबळजनक दावा युसूफने केला आहे.
Pakistan Historic Win Turning Point : दुबईतील ऐतिहासिक विजय ठरला शाप
टी-20 वर्ल्डकप 2021 पूर्वी पाकिस्तानने वर्ल्डकपच्या इतिहासात भारताला (India vs Pakistan) कधीही हरवले नव्हते. मात्र, दुबईत झालेल्या त्या सामन्यात बाबर आझमच्या (नाबाद 68) आणि मोहम्मद रिझवानच्या (नाबाद 79) फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले होते.
हा विजय पाकिस्तानसाठी खूप मोठा ऐतिहासिक क्षण म्हणून साजरा करण्यात आला, परंतु मोहम्मद युसूफच्या मते, याच ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तान क्रिकेटचा अधोगतीचा काळ सुरू झाला.
Mohammad Yousuf Attack : "कॉलर उडवून चालले अन् उद्ध्वस्त झाले"
एका वृत्तवाहिनीशी मोहम्मद युसूफने संघात आलेल्या अहंडपणावर जोरदार प्रहार केला. "2021 मध्ये भारतावर मिळवलेल्या विजयाने आमचे प्रचंड नुकसान केले. कारण त्या एका विजयानंतर खेळाडूंना आपण जग जिंकल्याचा भास झाला. पुढे काय करायचे, स्वतःला कसे सिद्ध करायचे हे त्यांना समजेनासे झाले," असे युसूफ म्हणाला.
तो पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही उत्तम कामगिरी करता, तेव्हा जमिनीवर पाय असणे गरजेचे असते. जर तुम्ही कॉलर उडवून फिराल आणि प्रतिस्पर्ध्यांचा आदर करणार नाही, तर अडचणी येणारच; अन् आज त्या सर्व समस्यांनी पाकिस्तान क्रिकेटला घेरले आहे."
Captaincy Fight In Pakistan : कॅप्टन होण्याच्या शर्यतीने पोखरला संघ
पाकिस्तानी संघातील अंतर्गत गटबाजीवर बोलताना युसूफने गुपित उघड केले. "भारताविरुद्धच्या विजयानंतर संघातील प्रत्येक खेळाडू स्वतःला कर्णधार (Captain) मानू लागला आणि कॅप्टन बनण्यासाठी शर्यत सुरू झाली. यामुळे संघाचे अपरिमित नुकसान झाले," असे त्याने स्पष्ट केले.
गेल्या चार पाच वर्षांत वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप, आशिया कप असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, पाकिस्तानने अत्यंत दर्जाहीन कामगिरी केली असल्याचे युसूफने मान्य केले.
PCB Action Support : पीसीबीच्या कारवाईचे युसूफकडून समर्थन
खेळाडूंवर टीका करताना युसूफ म्हणाला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) प्रत्येक वळणावर खेळाडूंना पाठिंबा दिला. अनेक प्रशिक्षक बदलले, सर्व सोयी-सुविधा दिल्या, पण एकाही खेळाडूने मैदानावर जबाबदारी घेतली नाही.
"खेळाडूंच्या या नाकर्तेपणामुळे शेवटी पीसीबीला कठोर पावले उचलावी लागली आणि मी पीसीबीच्या या कडक निर्णयांचे पूर्णपणे समर्थन करतो," असे सांगत मोहम्मद युसूफने पाकिस्तानी खेळाडूंची पोलखोल केली.
ही बातमी वाचा:
