Pakistan Cricket News : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघात मोठे बदल केले आहेत. सात खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर दोन प्रशिक्षकांवरही कारवाई करण्यात आली. त्यातच काही खेळाडूंचे फोन जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आता पाकिस्तानचे अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल सायबर क्राइम्स इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NCCIA) दोन्ही खेळाडूंना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर गुरुवारी लाहोरमध्ये दोघेही NCCIA समोर हजर झाले.

Continues below advertisement

रिझवान-इमामची अनेक तास चौकशी?

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर संघातील सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्यात आलं. रिझवान आणि इमाम-उल-हक यांचाही या सात खेळाडूंमध्ये समावेश होता. यानंतर दोघांना NCCIA समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. गुरुवारी दोघेही चौकशीसाठी उपस्थित राहिले. यापैकी किमान एका खेळाडूची अनेक तास चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, NCCIA ने नेमक्या कोणत्या प्रकरणात दोघांची चौकशी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या चौकशीचा संबंध पीसीबीने सुरू केलेल्या अंतर्गत शिस्तभंगाच्या चौकशीशी आहे की नाही, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Continues below advertisement

पीसीबीची आधीच अंतर्गत चौकशी सुरू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या आठवड्याच्या सुरुवातीला संघातील काही खेळाडूंच्या शिस्त आणि वर्तनासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनंतर अंतर्गत चौकशी सुरू केली होती. पीसीबीने त्यावेळी कोणत्याही खेळाडूचं नाव जाहीर केलं नव्हतं. बोर्डाने ही प्रक्रिया पीसीबीच्या नियमांनुसार सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता NCCIAच्या चौकशीमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रिझवान आणि इमाम-उल-हक यांच्यापैकी एका खेळाडूला प्रश्नावली देण्यात आली आहे. या प्रश्नावलीची उत्तरं देऊन ती पुढील आठवड्यात NCCIAकडे परत करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रश्नावलीमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आता रिझवान-इमामचं काय होणार?

रिझवान आणि इमाम हे पाकिस्तानच्या संघातील अनुभवी खेळाडू मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात दोघांची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यातच आता NCCIAची चौकशी, PCBची अंतर्गत चौकशी आणि त्यांच्या निवडीवर उपस्थित झालेले प्रश्न यामुळे दोघांच्याही अडचणी वाढल्याचं चित्र आहे. मात्र, NCCIAच्या चौकशीचा नेमका विषय काय आहे किंवा त्याचा मॅच फिक्सिंगशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे रिझवान आणि इमाम यांची पाकिस्तान संघातून कायमची हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चांना सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे ही वाचा -

Ind vs Afg 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी-इशान किशन IN; संजू सॅमसन-नितीश रेड्डी OUT; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 अशी असेल टीम इंडियाची धडाकेबाज Playing XI