Manchester United Owners Interest In New IPL Team : आगामी आयपीएल स्पर्धेत आणखी दोन संघ पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच बोली लागणार आहे. आयपीएल संघ विकत घेण्यासाठी भारतासह विदेशातीलही काही कंपन्यांनी रस दाखवला आहे. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, फुटबॉलमधील प्रसिद्द मँचेस्टर युनायटेड (Manchester United) संघाचे मालक आयपीएलचा संघ विकत घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच बीसीसीआयनं आपली बोलीची प्रक्रिया काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे.


मँचेस्टर युनायटेड या संघाची मालकी ग्लेजर कुटुंबाकडे आहे. मँचेस्टर युनायटेडला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या फुटबॉल क्लब म्हणून ओळखलं जातं. जगभरात मँचेस्टर युनायडेट क्लबचे चाहते उपलब्ध आहेत. प्रसिद्ध फूटबॉलपटू रोनाल्डो याच संघासाठी खेळत आहे. मँचेस्टर युनायटेड इंग्लंडमधील इंग्लिश प्रीमियर लीगचा भाग आहे. विराट कोहलीसह इतर भारतीय क्रिकेटपटूही मँचेस्टर युनायटेडचे चाहते आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने काही दिवसांपूर्वी मँचेस्टर क्लबला भेटही दिली होती. क्लबकडून बुमराहला मँचेस्टर संघाची जर्सीही भेट देण्यात आली. बुमराहच्या आधी इतर भारतीय खेळाडूंनीही मँचेस्टर क्लबला भेट दिली आहे.


टाइम्स ऑफ इंडियाने दिलेलल्या वृत्तानुसार, मँचेस्टर क्लबने बीसीसीआयकडून टेंडर खरेदी करण्याची कागदपत्रे घेतली आहेत. एका खासगी कंपनीद्वारे मँचेस्टर क्लबने बीसीसीआयकडून कागदपत्रे घेतली आहेत. आयपीएलमधील संघ विकत घेण्यास मँचेस्टर युनायटेड उत्सुक आहे. मँचेस्टर युनायडेट क्लब जगात नावाजलेला क्लब आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या संघाच्या लिलावावेळी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 300 कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांनाच या लिलावात सहभागी होता येईल. बीसीसीआयने नव्या संघाच्या टेंडरबाबातची तारीख वाढवली होती. 20 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवली होती. आता 25 ऑक्टोबर रोजी बीसीसीआय दोन नव्या संघाची घोषणा करणार आहे.


दोन नव्या आयपीएल संघामुळे बीसीसीआय मालामाल होणार आहे. बीसीसीआयच्या खात्यात जवळपास 5000 कोटी रुपये जमा होतील. आयपीएल सध्या आठ संघामध्ये खेळलं जातं. आता पुढील वर्षांपासून दहा संघामध्ये आयपीएलची स्पर्धा रंगणार आहे. दोन नवीन संघाची भर पडल्यामुळे सामन्यामध्येही वाढ होऊ शकते. पुढील हंगामात 74 सामने खेळले जातील.


कोणती शहरं आहेत स्पर्धेत?


जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असणारं अहमदाबाद सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याशिवाय पुणे आणि लखनौ या शहरांचाही समावेश आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एका स्टेडियमची  निवड होऊ शकते कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे.