Maharashtra Announce Squad for Ranji Trophy 2025-26 : भारताच्या घरगुती क्रिकेट हंगामाची रणजी ट्रॉफी 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. 16 खेळाडूंना संधी देण्यात आली असून, अनुभवी अंकित बावणे (Ankeet Bawane) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), जलज सक्सेना आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहेत. गायकवाड यापूर्वीही राज्य संघाचे नेतृत्व केलेले आहे.

पृथ्वी शॉला पुन्हा मिळाली संधी (Prithvi Shaw Maharashtra Squad for Ranji Trophy)

निवडकर्त्यांनी अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देत राजवर्धन हंगरगेकरच्या जागी प्रदीप दाधे याची निवड केली आहे. पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेना हे दोघेही या घरगुती हंगामापूर्वी महाराष्ट्र संघात दाखल झाले होते. पृथ्वीने कठीण काळानंतर आपला जुना मुंबई संघ सोडला होता. त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही आपले स्थान गमावले होते. आता तो आपल्या कारकिर्दीला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्राच्या संघात सामील झाला आहे. 

पृथ्वी शॉने कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती, मात्र त्यानंतर त्याच्या खेळात सातत्य राहिले नाही. त्याने भारताकडून 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. पण खराब कामगिरीमुळे तो राष्ट्रीय संघात स्थिरावू शकला नाही. तर जलज सक्सेना यांनी 2005-06 मध्ये मध्य प्रदेशकडून पदार्पण केले. नंतर तो 2016-17 हंगामात केरळ संघात गेला आणि मागील वर्षी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला, जिथे केरळला विदर्भकडून पराभव पत्करावा लागला.

केरळविरुद्ध महाराष्ट्राची पहिली लढत 

मागील रणजी हंगामात महाराष्ट्राने 7 सामने खेळले, त्यापैकी 2 विजय, 2 बरोबरी आणि 3 पराभव असे निकाल लागले. त्यामुळे महाराष्ट्र एलीट गट ‘ए’ मध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला होता. महाराष्ट्राला या हंगामात ग्रुप बी मध्ये स्थान मिळाले आहे. या गटात केरळ, सौराष्ट्र, चंदीगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान तिरुवनंतपुरम येथे केरळविरुद्ध खेळवला जाणार आहे.

महाराष्ट्राचा संघ (Maharashtra squad for Ranji Trophy 2025-26) :

अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, सौरभ नवले (यष्टीरक्षक), मंदार भंडारी (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी,  प्रदीप दधे, हितेश वाळुंज, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे, रजनीश गुरबानी.