Happy Birthday Zaheer Khan: भारताचा स्टार माजी वेगवान गोलंदाजी जहीर खान (Zaheer Khan) आज त्याच्या 44वा वाढदिवस साजरा करत आहे. जहीरची जगभरातील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. तसेच भारताच्या अनेक विजयात त्यानं महत्वाची भूमिका बजावलीय. जहीर खाननं बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात  2000 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. जहीर खाननं क्रिकेटसाठी इंजिनिअरिंगही सोडलं. जसे इंजिनीअर त्यांच्या क्षेत्रात काही नव्या गोष्टीचा प्रयोग करून जगसमोर मांडतात. त्याचप्रकारे जहीर खाननं क्रिकेटविश्वात नकल बॉलचा शोध लावून जगावर आपला ठसा उमटवला.


नकल बॉलची सुरुवात
2004-05 दरम्यान जहीर खानला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता. ज्यामुळं त्याला संघाबाहेरही पडावं लागलं होतं. त्यावेळी जहीरनं नकल बॉलचा शोध लावून त्यासाठी जोरदार सराव केला.  भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर त्यानं नकल बॉलचा प्रयोग केला आणि यशस्वीही ठरला. जहीर खानची नकल बॉल आजही प्रसिद्ध आहे. फलंदाजांना चकवा देण्यासाठी गोलंदाजांकडून नकल बॉलचा वापर केला जातो.


क्रिकेटसाठी इंजिनीअरिंग सोडली
जहीर खानचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 मध्ये महाराष्ट्राच्या श्रीरामपूर येथे झाला. झहीर खानची क्रिकेटर बनण्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. झहीरचं सुरुवातीचं शिक्षण श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळ नवीन मराठी प्राथमिक शाळेत झालं. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केजे सोमय्या माध्यमिक विद्यालयात केलं. त्यानंतर त्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. पण त्यांचे मन क्रिकेटमध्ये स्थिरावलं. झहीरची ही आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला सल्ला दिला की, देशात अनेक इंजिनिअर आहेत, तू वेगवान गोलंदाज बन.' त्यानंतर जहीर खानच्या क्रिकेटर बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.


17 व्या वर्षी क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात
जहीर खानला जॅक या नावानं ओळखलं जातं. वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर जहीर खाननं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानं जिमखाना क्लबविरुद्ध खेळलेलय्या एका सामन्यात सात विकेट्स घेतले आणि प्रकाशझोतात आला. त्यावेळी एमआरएफची पेस फाऊंडेशन टीए शेखरचं लक्ष जहीर खानकडं गेलं. त्यानंतर त्यांनी जहीरला चेन्नईला घेऊन गेले. जिथे जहीरनं त्याच्या गोलंदाजीला आणखी धार लावली. त्यानंतर त्यानं फर्स्ट क्लास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 


जहीर खानची कारकिर्द
दरम्यान, 2011 च्या विश्वचषकात 23 विकेट घेणाऱ्या झहीर खानची कारकीर्द चांगलीच गाजली. झहीर खाननं वर्ल्ड कपमध्ये एकूण 44 विकेट घेतल्या आहेत. त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 92 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 311 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 200 एकदिवसीय सामने खेळताना 282 आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 17 विकेट्स त्याच्या खात्यात जमा झाल्या आहेत.