Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सोमवारी (24 एप्रिल) वयाचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आपला वाढदिवस कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या  हॉटेलमध्ये साजरा केला. क्रिकेटचा देव त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थेट देवभूमी कोकणात पोहोचला. साधेपणाने वाढदिवस साजरा केल्यानंतर मुंबईकडे परतत असताना सचिन तेंडुलकर याने चिमुकल्या चाहत्याची इच्छा पूर्ण केली. 


क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सावंतवाडीतील ओम अमोल टेंबकर या चिमुकल्याने भेट घेतली. त्यानंतर सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सिझनच्या बॉलवर ऑटोग्राफ केली. घाई गडबडीत असताना सुद्धा सचिनने त्या चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली. सचिन तेंडुलकर याने त्या चिमुकल्या चाहत्याला वेळ दिला व "गुड बॉय" म्हणून कौतुक केले.


क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर हा गेले दोन दिवस वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आला होता. गेले दोन दिवस त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये राहण्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळण्याचा आस्वाद लुटला होता. आज मोपा विमानतळावरून परतीच्या प्रवासाला निघाला. यावेळी त्याचा चाहता असलेल्या सावंतवाडीतील चिमुकल्या ओमने त्याची मोपा विमानतळ परिसरात भेट घेतली. 




यावेळी सुरक्षेच्या गराड्यात आणि घाई गडबडीत असताना सुद्धा सचिनने त्याला वेळ दिला. यावेळी ओम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सीजन बॉलवर सचिनची ऑटोग्राफ घेतली. सचिन तेंडुलकर याची ऑटोग्राफ घेतल्यानंतर ओमचा आनंद गगनात मावत नव्हता.


 


कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता सचिन?
आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात दाखल झाला. सचिनने आपला वाढदिवस भोगवे समुद्रकिनारी असलेल्या साध्या हॉटेलमध्ये साजरा केला. या हॉटेलचं नाव, कोकोश्यामबाला.. याच कोकोश्यामबालामध्ये त्याने मुक्काम केला. या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसंच क्रिकेटपटूही येऊन गेले आहेत. तर सचिनने पहिल्यांदाच आपला वाढदिवस निसर्गरम्य सिंधुदुर्गात साजरा केला. काल सचिन मित्र आणि कुटुंबीयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आणि तिथे जाऊन त्याने ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे किनारी फेरफटका मारला. यावेळी भोगवे किनारी असलेल्या पर्यटकांच्या इच्छेला मान देत त्याने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो काढता आल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याचसोबत परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर आणि सचिनच्या मित्रांनी भेट दिली.