IND vs SL 2nd Test Playing XI Update :गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली असून आता दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत मालिका 2-0 अशी खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत सर्वच विभागात दमदार कामगिरी केली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली, तर गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची अक्षरशः कोंडी केली. विशेषतः मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून तब्बल 10 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी संघ निवडताना टीम मॅनेजमेंटकडे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आव्हान आहे.
कुलदीप यादवला बसणार डच्चू? (Kuldeep Yadav OUT India Playing XI)
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग-11 मध्ये सर्वात मोठा बदल गोलंदाजी विभागात होण्याची शक्यता आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याला पहिल्या कसोटीत अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली नाही. कर्णधार शुभमन गिलने त्याच्याकडून केवळ 25 षटके गोलंदाजी करून घेतली. दुसरीकडे मानव सुथारने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले, तर रवींद्र जडेजानेही मोठ्या प्रमाणात गोलंदाजी केली. यामुळे दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादवच्या जागेवर मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू सारांश जैन याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. 33 वर्षीय सारांश जैन उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबतच ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. श्रीलंकेच्या परिस्थितीत ऑफ-स्पिनचा पर्याय भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे टीम मॅनेजमेंट कुलदीपच्या जागी सारांशला संधी देण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकते.
ध्रुव जुरेलमुळे सरफराजला पुन्हा प्रतीक्षा
फलंदाजीच्या क्रमात मात्र मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावत आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. त्याच्या या कामगिरीमुळे विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघातील त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. त्यामुळे संघात स्थान मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरफराज खानला आणखी काही काळ बाकावर बसावे लागू शकते. मिडल ऑर्डरमध्ये जुरेलसह ऋषभ पंतच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाकडे आधीच चांगले पर्याय आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीत विजय मिळवून देणाऱ्या संयोजनात विनाकारण बदल करण्याची शक्यता कमी आहे.
टॉप ऑर्डरमध्येही बदलाची शक्यता नाही (India's Predicted Playing XI)
भारताच्या टॉप ऑर्डरमध्येही सध्याच्या संयोजनालाच पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी संघाच्या फलंदाजीला भक्कम आधार दिला आहे. विशेषतः देवदत्त पडिक्कलने पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच, वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची जोडी कायम राहण्याची शक्यता आहे. गुरनूर ब्रारच्या समावेशाची चर्चा असली तरी दुसऱ्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सरांश जैन, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
हे ही वाचा -
