Shreyas Iyer Viral Video : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या दुखापतीने भारतीय संघाची आणि चाहत्यांची चिंता वाढली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपलाही दोघे मुकले होते. आता आगामी विश्वचषक आणि आशिया चषकात अय्यर खेळणार का? असा सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येत होता. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर जवळपास पूर्णपणे फिट झालाय. आज त्याने बेंगलोरमधील एनसीएमध्ये सराव सामन्यात सहभाग घेतला होता. फलंदाजी आणि फिल्डिंग करताना दिसलाय. श्रेयस अय्यर फिल्डिंग करतानाचा आणि फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


श्रेयस अय्यरला मैदानावर पुनरागमन करताना पाहणे टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी दिलासादायक  आहे. श्रेयस अय्यर बराच काळ मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2023 च्या आधीच श्रेयस अय्यर याला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ सतत मधल्या फळीच्या समस्येशी झुंजत होता. भारतीय संघ व्यवस्थापनाव्यतिरिक्त, चाहते श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या फिटनेसकडे लक्ष देऊन होते. पण आता श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या पुनरागमनानंतर मधल्या फळीची समस्या संपेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.











आशिया चषकात राहुल-श्रेयसची वर्णी लागणार का ?



 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 या स्पर्धेला सुरूवात होत आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल आशिया कपमधून पुनरागमन करू शकतात, असे मानले जात आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. जसप्रीत बुमराह याने दुखापतीनंतर कमबॅक केलेय.  आता श्रेयस अय्यर आणि राहुल यांच्या पुनरागमनाकडे नजरा आहेत.