KL Rahul Century : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावत अक्षरशः धुमाकूळ घातला. पण एवढ्यावरच तो थांबला नाही, या शतकासह त्याने असा पराक्रम करून दाखवला, जो आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला साध्य करता आला नव्हता. एक वेळ अशी होती की, तो फक्त 12 धावांवर असताना पंजाबकडे त्याला बाद करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र ती त्यांनी दवडली आणि त्याचाच फायदा घेत राहुलने थेट शतक ठोकलं.
भारतीय फलंदाजाची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
राहुल आयपीएल आणि टी-20 क्रिकेट या दोन्हीमध्ये सर्वोच्च खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता, ज्याने 141 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे केएल राहुल आयपीएलमधील तिसरा सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या पुढे ख्रिस गेल (175) आणि ब्रेंडन मॅककुलम (158) आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा राहुल हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी तिलक वर्माने राजकोटमधील एका देशांतर्गत सामन्यादरम्यान 151 धावा केल्या होत्या.
क्रिस गेलची बरोबरी
राहुलच्या या सहाव्या शतकासह त्याने क्रिस गेल याची बरोबरी केली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतकांच्या यादीत राहुल आणि गेल दोघेही आता संयुक्त तिसऱ्या स्थानावर (6-6 शतकं) पोहोचले आहेत. राहुलच्या पुढे आता फक्त दोनच दिग्गज खेळाडू आहेत. विराट कोहली आणि जोस बटलर. कोहलीच्या नावावर सर्वाधिक 8 शतकं आहेत, तर बटलरने 7 वेळा शतकाचा टप्पा पार केला आहे.
12 धावांवर मिळाला जीवनदान
डावाच्या तिसऱ्या षटकात राहुलला 12 धावांवर बाद करण्याची मोठी संधी पंजाबकडे होती. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर पुल शॉट खेळताना राहुलने चेंडू स्क्वेअर लेगवर उभ्या शशांक सिंहच्या हातात मारला, पण त्याने तो सोपा झेल सोडला. आणि नंतर, तो 51 धावांवर असताना विजयकुमार वैशाखने त्याचा झेल सोडला, ज्यामुळे त्याला दोनदा जीवदान मिळाले. या जीवनदानाचा राहुलने पूर्ण फायदा घेत थेट शतक ठोकलं.
धोनीच्या विक्रमालाही गाठलं
राहुलने 13 धावा करताच आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सहावं स्थान पटकावलं आणि एमएस धोनी यांच्या 5439 धावांचा विक्रम मागे टाकला. आता राहुलच्या पुढे केवळ पाच खेळाडू आहेत, ज्यामध्ये चार भारतीय आणि एक परदेशी खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम अद्याप विराट कोहली यांच्या नावावर असून त्यांनी 8989 धावा केल्या आहेत. ते 9000 धावांच्या टप्प्यापासून फक्त 11 धावा दूर आहेत. कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा असून त्यांच्या नावावर 7183 धावा आहेत. कोहली आणि रोहित यांच्यात सुमारे 2000 धावांचं अंतर आहे.
हे ही वाचा -
