Kieron Pollard VIDEO : 6,6,0,6,6,6,6,6…. ‘तात्या ऑन फायर’, 8 पैकी 7 चेंडू थेट आकाशात, किरॉन पोलार्डच्या खेळीने स्टेडियम हादरलं, मिळाले हे बक्षीस
Kieron Pollard CPL 2025 News : किरॉन पोलार्ड याने कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 मध्ये धडाकेबाज खेळी साकारत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Kieron Pollard VIDEO : किरॉन पोलार्ड याने कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 मध्ये धडाकेबाज खेळी साकारत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सोमवारी झालेल्या सामन्यात त्याने चौफेर फटकेबाजी करत केवळ 29 चेंडूत 224.14 च्या स्ट्राईक रेटने झंझावाती 65 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 8 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्रिनबागो नाईट रायडर्सने (TKR) प्रथम फलंदाजी करत 179 धावांचे भक्कम लक्ष्य उभारले. प्रत्युत्तरात सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स (SKN) केवळ 167 धावांवर गारद झाले. त्यामुळे त्रिनबागो नाईट रायडर्सने हा सामना 12 धावांनी जिंकत रोमांचक विजय मिळवला.
पोलार्डने 8 चेंडूत ठोकले 7 षटकार
किरॉन पोलार्डने आधी सुरुवातीला सावधगिरीने फलंदाजी केली. त्रिनबागो नाईट रायडर्सचा हा तडाखेबाज खेळाडू पहिल्या 13 चेंडूत केवळ 12 धावा करून स्थिरावला. मात्र एकदा नजर सरावल्यानंतर त्याने गोलंदाजांचा समाचार घेतला. 15व्या षटकात नवीन बिदेसी गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पोलार्डने सलग दोन षटकार ठोकले. पाचवा चेंडू चुकवला, पण लगेचच सहाव्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला.
POLLY POWERRR!!! 💪🇹🇹
— CPL T20 (@CPL) September 1, 2025
Kieron Pollard raises yet another CPL fifty! 🙌#CPL25 #CricketPlayedLouder#BiggestPartyInSport #TKRvSKNP #RepublicBank pic.twitter.com/huJek5r4cL
यानंतर 16वे षटक टाकण्यासाठी अफगाणिस्तानचा गोलंदाज वकार सलामखिल आला. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पोलार्डला स्ट्राईक मिळाली. त्याने त्यानंतर वकारच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग चार षटकार ठोकले. अशा प्रकारे पोलार्डने खेळलेल्या 8 चेंडूत तब्बल 7 षटकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
पोलार्ड ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'
त्रिनबागो नाईट रायडर्सच्या सलामीवीरांपैकी कॉलिन मुनरो (17) आणि अॅलेक्स हेल्स (7) मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. त्यानंतर डॅरेन ब्रावोही 21 धावांवर बाद झाला. मात्र, किरॉन पोलार्डच्या साथीला निकोलस पूरन उभा राहिला. त्याने जबाबदारी स्वीकारत 38 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. पोलार्डच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर TKR ने प्रथम फलंदाजी करत सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्ससमोर 180 धावांचे आव्हान ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सची सुरुवात दणदणीत झाली. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 96 धावांची भागीदारी रचली. इविन लुईसने 25 चेंडूत 4 षटकारांसह 42 धावा ठोकल्या, तर आंद्रे फ्लेचरने 54 चेंडूत 67 धावांची खेळी साकारली. मात्र, ही जोडी माघारी परतल्यानंतर संघाचा डाव कोसळला आणि ते विजयापासून अवघ्या 13 धावांनी दूर राहिले. त्रिनबागोच्या गोलंदाजांपैकी मोहम्मद आमिरने 2 तर नॅथन एडवर्ड्सने 3 बळी टिपले. झंझावाती फलंदाजीबद्दल किरॉन पोलार्डला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा -




















