Kevin McKenzie passes away at 77 : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज आणि 'कसोटी क्रिकेट न खेळू शकलेले सर्वोत्तम खेळाडू' म्हणून ओळखले जाणारे केविन मॅकेन्झी (Kevin Alexander) यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. गोल्फ कोर्सवर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि क्रीडा विश्वाने एक महान खेळाडू गमावला. केविन हे दक्षिण आफ्रिकेचे माजी स्टार फलंदाज नील मॅकेन्झी यांचे वडील होते.

एक महान कारकीर्द, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित

केविन मॅकेन्झी यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ट्रान्सवाल (Transvaal) संघासाठी 133 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यांनी 36.51 च्या सरासरीने 6,756 धावा केल्या, ज्यात 13 शतकांचा समावेश होता. 36 ची सरासरी आजच्या काळात सामान्य वाटू शकते, मात्र 70 आणि 80 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असायच्या. अशा परिस्थितीत त्यांनी केलेली ही कामगिरी त्यांच्या कौशल्याची साक्ष देते.

मॅकेन्झी यांचा दुर्दैव म्हणजे, त्यांची कारकीर्द अशा काळात होती जेव्हा दक्षिण आफ्रिकेवर वर्णभेद (Apartheid) धोरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. 1970 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर ही बंदी लादण्यात आली, ज्यामुळे मॅकेन्झी यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान खेळाडूंना अधिकृत कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.

वडिलांचा वारसा मुलाने चालवला

आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत ओळख नसतानाही, मॅकेन्झी यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी 7 अनधिकृत (Unofficial) कसोटी सामने खेळले होते. केविन यांचे स्वप्न त्यांचे चिरंजीव नील मॅकेन्झी यांनी पूर्ण केले. नील यांनी 2000 ते 2009 या काळात दक्षिण आफ्रिकेसाठी 58 कसोटी, 64 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास 5,000 धावा केल्या. नील मॅकेन्झी यांची गणना दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सलामीवीरांमध्ये केली जाते.

माजी सहकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

केविन यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे माजी सहकारी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज विन्स व्हॅन डर बिजल यांनी अत्यंत भावूक शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "केविन यांच्या अचानक जाण्याच्या बातमीने आम्ही सर्व हादरलो आहोत. ते फक्त एक उत्तम खेळाडू नव्हते, तर एक महान माणूस होते. ज्यांनी त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या विरोधात क्रिकेट खेळले, त्या सर्वांचे ते लाडके होते. मैदानावर ते एक निष्ठावान सहकारी आणि तितकेच दिलदार प्रतिस्पर्धी होते."

हे ही वाचा -

Josh Inglis CSK vs LSG  IPL 2026 : 6,6,6,6,6... जोश इंग्लिसचा चेपॉकवर तांडव! पूरनचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सगळेच पाहत राहिले