England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची रोमहर्षक कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत करुण नायरला पहिल्या तीन कसोटींमध्ये संधी मिळाली होती. पण, तो संधीचं सोने करू शकला नाही. तब्बल आठ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या नायरची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यामुळे 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याचा पत्ता कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण खेळणार आणि कोण बाहेर जाणार, याचा निर्णय लवकरच होणार आहे.

करुण नायरच्या जागी साई सुदर्शन?

करुण नायरने या मालिकेतील सहा डावांत अनुक्रमे 0, 20, 31, 26, 40 आणि 14 धावा केल्या आहेत. या आकड्यांकडे पाहता, संघ व्यवस्थापनासाठी त्याला पुन्हा संधी देणं कठीण वाटतंय. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील टीम मॅनेजमेंट त्याच्या कामगिरीकडे डोळेझाक करेल, अशी शक्यता कमीच आहे. त्याच्या जागी युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संधी दिली जाऊ शकते.

नंबर 3 वर नायर अपयशी, मिडल ऑर्डरवर दडपण

नंबर 3 हा कसोटी क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा क्रमांक मानला जातो. सलामीवीर लवकर माघारी गेल्यास, हा फलंदाज डाव सावरतो. मात्र करुण नायर ही जबाबदारी पेलू शकलेला नाही. त्याच्या लवकर बाद झाल्यामुळे मिडल ऑर्डरवर दडपण येत आहे. वरिष्ठ फलंदाज म्हणून त्याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही. पण लीड्स कसोटीत पदार्पण करताना साई सुदर्शन पहिल्या डावात अपयशी ठरला, दुसऱ्या डावात त्याने संयमी 30 धावांची खेळी खेळली. त्याच्यातील स्थैर्य आणि तंत्र पाहता, मँचेस्टर कसोटीत त्याला अंतिम 11 मध्ये पुन्हा संधी मिळू शकते.

जसप्रीत बुमराहला विश्रांती, कोण घेणार जागा?

संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहसाठी '1-3-5' फॉर्म्युला ठरवला आहे. म्हणजेच, तो आता पाचव्या कसोटीत खेळणार असून मँचेस्टरमध्ये त्याला विश्रांती दिली जाणार आहे. आता प्रश्न आहे की त्याच्या जागी कोण येणार?

प्रसिद्ध कृष्णा की शार्दुल ठाकुर?

हेडिंग्लेमध्ये प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी सामान्य होती. म्हणूनच त्याला तिसऱ्या कसोटीत वगळण्यात आलं. दुसरीकडे, शार्दुल ठाकुरने पहिल्या कसोटीत भाग घेतला होता, मात्र त्याला केवळ 16 षटके गोलंदाजीची संधी मिळाली होती. आता चौथ्या कसोटीत संघाला एक गोलंदाजीसह फलंदाजीचा पर्याय हवा असेल, तर शार्दुलकडे झुकता माप दिलं जाऊ शकतं.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test WTC Points Table : लॉर्ड्सवर मिळवली शान, पण ICC कडून बसली कानफटात, इंग्लंडला धक्क्यावर धक्के, 48 तासात अव्वल स्थान गमावलं