Jasprit Bumrah Ind vs Eng 5th Test: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng 5th Test Match) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न टीम इंडियाकडून असणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यातून मुकणार आहे. जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटीतून विश्रांती दिली जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ईएसपीएनच्या वृत्तानूसार जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी खेळणार नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असणार आहे. तसेच जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप संघात स्थान दिले जाईल. तर अंशुल कंबोजच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल-

भारताला पाचवा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने तीन बदल केले होते. दुखापतीमुळे दोन बदल करण्यात आले होते, तर एक करुण नायरच्या खराब फॉर्ममुळे त्याला वगळून साई सुदर्शनला संधी देण्यात आली होती. तसेच आकाश दीपला दुखापत झाल्यानं अंशुल कंबोजला संधी देण्यात आली. तर जखमी नितीश कुमार रेड्डी यांच्या जागी शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात तिन्ही खेळाडू अपयशी ठरले.

टीम इंडियाची संभाव्य Playing XI: 

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल,  करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, ख्रिस वोक्स, जॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, बेन डकेट, ब्रायडन कार्स, गस अ‍ॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, लियाम डॉसन, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, जोफ्रा आर्चर, जोश टंग.

संबंधित बातमी:

Eng Squad vs Ind 5th Test : बेन स्टोक्सचा धडाकेबाज निर्णय! फक्त 1 सामना खेळलेला खेळाडू थेट संघात, इंग्लंड बोर्डाची घोषणा