Jasprit Bumrah In Powerplay : यंदाच्या विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केलाय. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या दांड्या गुल केल्यात. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा बॉलिंग अॅटक सर्वात खतरनाक असल्याचे अनेक दिग्गजांनी म्हटलेय. याला आकडेही साक्ष देतात. पॉवरप्लेमध्ये भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. जसप्रीत बुमराहने तर कहरच केला. पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकलेत. यंदाच्या विश्वचषकात पॉवर प्लेमध्ये बुमराहच्या तोडीचा कोणताही गोलंदाज नसल्याचे दिसतेय. बुमराहच्या माऱ्यापुढे दिग्गज फलंदाजांना एक धाव घ्यायची म्हटले तरी संघर्ष करावा लागल्याचे दिसतेय. ऑस्ट्रेलियविरोधात बुमराहने चार षटके गोलंदाजी केली, यामध्ये त्याने फक्त 11 धावा दिल्या. त्याने एका फलंजाला तंबूतही धाडले. 


पावरप्लेमध्ये बुमराहची पॉवर, प्रतिस्पर्धी फलंदाज ध्वस्त


अफगाणिस्तानविरोधात बुरमहाने पॉवरप्लेमध्ये चार षटके गोलंदाजी करताना फक्त 9 धावा खर्च केल्या. त्याशिवाय एका अफगाण फलंदाजाला तंबूतही धाडले. पाकिस्तानविरोधातही बुमराहने भेदक मारा केला. बुमराहने 4 षटकात फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या. त्याशिवाय एक विकेटही घेतली. 


पुण्यात बांगलादेशविरोधात बुमराहने प्रभावी मारा केला होता. या सामन्यात बुमराहला विकेट मिळाली नाही.  बुमराहने चार षटकात फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. बलाढ्य न्यूझीलंडविरोधातही बुमराहने किफायतशीर गोलंदाजी केली होती. धरमशालाच्या मैदानात बुमराहने पावरप्लेच्या चार षटकात फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याशिवाय एक विकेटही घेतली. 


इंग्लंडविरोधात जसप्रीत बुमराहने पावर प्लेमध्ये 5 षटके भेदक मारा केला होता. बुमराहने फक्त 17 धावा खर्च करत दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबईत श्रीलंकाविरोधात बुमराहने कहर गोलंदाजी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुमराहने पावरप्लेमध्ये पाच षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याशिवाय एक विकेटही घेतली होती. कोलकात्यामध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात बुमराहने 4 षटकात फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. आज नेदरलँड्सविरोधातही जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 19 धावा खर्च केल्या. 
 


यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर आहे. बुमराहने 9 सामन्यात 16.80 च्या सरासरीने 16 फलंदाजांना बाद केलेय. जसप्रीत बुमराह याने सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यामुळेच इतर गोलंदाजांना विकेट मिळाल्या.