Ishan Kishan T20 century News Marathi : ईशान किशनने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत दमदार पुनरागमन केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात ईशानने ही ऐतिहासिक कामगिरी केली. डावखुरा फलंदाज असलेल्या ईशानने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडवली. एका षटकात त्याने तब्बल 29 धावा चोपल्या, तर फिरकीपटू ईश सोढीच्या एका षटकातील सहाही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत प्रेक्षकांना थक्क केलं.

Continues below advertisement

ईशानने अवघ्या 28 चेंडूत चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर फक्त 42 चेंडूत आपलं शतक साजरं केलं. या शतकी खेळीत त्याने 10 षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली. याआधी ईशान किशनचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर 89 धावा इतका होता. आपल्या 36व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पहिलं शतक झळकावलं.

Continues below advertisement

या मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात ईशान किशन खेळला नव्हता. त्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसदरम्यान ईशानला किरकोळ दुखापत असल्याचं सांगितलं होतं. मात्र रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ईशानने अर्धशतक झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला होता. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याने दाखवलेला हा फॉर्म भारतीय संघासाठी अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.

ऑगस्ट 2024 पासून ईशान किशनची दमदार कामगिरी

ऑगस्ट 2024 पासून ईशान किशनने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली आहे. भारतीय संघाबाहेर गेल्यानंतरही त्याने बूची बाबू स्पर्धा, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, आयपीएल, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या सामन्यात तो 43 चेंडूत 103 धावा करून बाद झाला. जेकब डफीच्या गोलंदाजीवर फिलिप्सने त्याचा झेल घेतला.

वर्ल्ड कपच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान पक्कं 

7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ईशान किशन हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. या शतकी खेळीनंतर प्लेइंग-11  मध्ये सलामीवीर म्हणून त्याची जागा जवळपास पक्की झाल्याचं चित्र आहे. ही खेळी आणखी खास ठरते कारण वर्ल्ड कपपूर्वीचा हा भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. तिरुवनंतपुरमच्या प्रेक्षकांना हाय-वोल्टेज सामना पाहायला मिळावा अशी अपेक्षा होती आणि ईशानने त्यांना अजिबात निराश केलं नाही. ईशानच्या या आक्रमक शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे. 

हे ही वाचा -

Australian Open Final 2026 : ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये उलटफेर! वर्ल्ड नंबर वन सबालेंकाचा पराभव, रायबाकिनाने पटकावले 2026 चे जेतेपद