Irfan Pathan Viral Video : भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी संघर्षाचा परिणाम आता थेट क्रीडाक्षेत्रावरही दिसून येत आहे. विशेषतः क्रिकेटच्या मैदानावर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आतापर्यंत आयसीसी किंवा एसीसी स्पर्धांसाठी एकमेकांच्या देशात न जाण्यापुरती मर्यादा होती, पण आता हात न मिळवण्याचा वादही पेटला आहे. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण एका सामन्यानंतर दोघेही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करताना आणि मिठी मारताना दिसले.
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे वर्ल्ड क्रिकेट फेस्टिव्हल अंतर्गत डबल विकेट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भरलेल्या संघांनी सहभाग घेतला होता. गुरुवार 22 जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 4 षटकांत 56 धावा केल्या. शोएब मलिक आणि इमरान नजीर यांनी आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानला भक्कम धावसंख्या उभारून दिली.
भारताकडून कर्णधार इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र भारताला 4 षटकांत केवळ 51 धावाच करता आल्या. यात इरफान पठाणने एकट्याने 49 धावा केल्या, तर बिन्नीला खातेही उघडता आले नाही. परिणामी पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला. मात्र सामन्याच्या निकालापेक्षा सामना संपल्यानंतर घडलेल्या घटनेनेच अधिक चर्चा निर्माण केली.
इरफान पठाणची गळाभेट चर्चेत
सामना संपल्यानंतर इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी शोएब मलिकशी हस्तांदोलन केले आणि त्याला मिठीही मारली. त्यानंतर दोन्ही संघांतील सर्व खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवले, जशी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षातील घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू पहिल्यांदाच एकमेकांशी हात मिळवताना दिसल्याने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनी इरफान पठाणला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली.
हात न मिळवण्याचा वाद कुठून सुरू झाला?
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर मे महिन्यात भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिकच बिघडले. याचा थेट परिणाम क्रिकेट सामन्यांवरही झाला. लष्करी संघर्षानंतर काही आठवड्यांतच इंग्लंडमध्ये माजी खेळाडूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यावरून वाद निर्माण झाला. हरभजन सिंग, युवराज सिंग यांच्यासह अनेक माजी भारतीय खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले आणि अखेर त्यांनी सामना खेळण्यास नकार देत बायकॉट केला.
यानंतर झालेल्या आशिया कप टी-20 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने खेळवले गेले, मात्र तिथेही तणाव स्पष्टपणे दिसून आला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण भारतीय संघाने टॉसवेळी आणि सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. हीच परिस्थिती स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये कायम राहिली.
हे ही वाचा -
