IPL 2027 Trade Update News : पाच वेळेस आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी हंगामापूर्वी आपला कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याची पूर्ण तयारी केली आहे. हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझींनी रस दाखवला असून, आता यात दिल्ली कॅपिटल्सचे नाव सर्वात पुढे आले आहे. दिल्लीच्या आधी चेन्नई सुपर किंग्जसोबत (CSK) मुंबईची चर्चा सुरू होती, परंतु ती डील पूर्ण होऊ शकली नाही.
अक्षर पटेलसोबत पृथ्वी शॉची ऑफर
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सने हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी आपला कर्णधार अक्षर पटेलची ऑफर मुंबईला दिली आहे. एवढेच नाही, तर अक्षर पटेलसोबतच दिल्ली संघ सलामीवीर पृथ्वी शॉलाही मुंबई इंडियन्सला देण्यास तयार आहे. आता मुंबईची टीम दिल्लीची ही ऑफर स्वीकारते की नवीन काही अट ठेवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सीएसकेसोबतची डील का फिस्कटली?
दिल्ली कॅपिटल्सआधी सीएसकेने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी उत्सुकता दाखवली होती. सीएसकेची ऑफर अशी होती की, ते हार्दिकच्या बदल्यात शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तब्बल 10 कोटी रुपये रोख देण्यास तयार होते. ही ऑफर मुंबईसाठी अतिशय आकर्षक मानली जात होती. मात्र, मुंबईने ब्रेव्हिसच्या ऐवजी युवा खेळाडू आयुष म्हात्रेची मागणी केली. भविष्याचा विचार करता सीएसके आयुष म्हात्रेला सोडण्यास तयार नव्हती, ज्यामुळे ही डील मोडली.
मुंबई इंडियन्स हार्दिकला ट्रेड का करू इच्छिते?
हार्दिक पंड्यासारख्या स्टार ऑलराउंडरला ट्रेड करण्यामागे मुंबई इंडियन्सची काही ठोस कारणे आहेत. दोन हंगामांपूर्वी मुंबईने गुजरात टायटन्सकडून हार्दिकला ट्रेड करून संघात आणले होते. हार्दिकने गुजरातला पहिल्याच मोसमात चॅम्पियन बनवले आणि दुसऱ्या मोसमात फायनलपर्यंत पोहोचवले. हेच यश पाहून मुंबईने त्याला पुन्हा संघात घेऊन थेट कर्णधारपद सोपवले.
मात्र, गुजरातमध्ये मिळालेले यश हार्दिकला मुंबईत मिळवता आले नाही. संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या मतभेदांच्या बातम्या आणि संघाची सलग दोन हंगामांतील अत्यंत निराशाजनक कामगिरी यामुळे मुंबईचे मोठे नुकसान झाले. सोबतच हार्दिकचा स्वतःचा खराब फॉर्मही चिंतेचा विषय ठरला. तसेच, मुंबईकडे आता तिलक वर्मासारखा युवा पर्याय उपलब्ध आहे, जो भविष्यात दीर्घकाळासाठी संघाचे नेतृत्व करू शकतो. याच सर्व कारणांमुळे मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याच्या विचारात आहे.
हे ही वाचा -
