IPL Auction 2026 Players List : इंडियन प्रीमियर लीगची (IPL) लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होणार असून या लिलावात एकूण 350 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 240 भारतीय तर 110 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. अलीकडेच वनडेमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात परतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकचे नाव या अंतिम यादीत आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा देखील या यादीत आहे. स्मिथ शेवटी 2021 मध्ये आयपीएल खेळला होता.
आयपीएलच्या निवेदनानुसार यंदाच्या लिलावासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील छाननी केल्यानंतर त्यातूनच अंतिम 350 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलमधील दहा फ्रँचायझी टीम्स या 350 खेळाडूंमधून उरलेल्या 77 जागा भरतील.
पृथ्वी शॉ आणि मुंबईचा सरफराज खान पहिल्या सेटमध्ये
लिलावातील पहिल्या सेटमध्ये भारताचे पृथ्वी शॉ आणि मुंबईचा सरफराज खान यांचा समावेश आहे. दोघांनीही आपली मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली आहे. पृथ्वी 2018 ते 2024 पर्यंत आयपीएलमध्ये खेळला, पण गेल्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. सरफराज 2021 नंतर आयपीएलमध्ये दिसला नाहीत. पहिल्या सेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कॅमरन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरही नावे आहेत. या सर्वांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.
केकेआर अन् चेन्नईकडे सगळ्यात जास्त पैसे
कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेल्या ऑलराउंडर वेंकटेश अय्यरनेही आपली मूळ किंमत 2 कोटी ठेवली आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे कुणाल चंदेला आणि अशोक कुमार याचादेखील अंतिम यादीत समावेश आहे. तीन वेळची विजेती केकेआरकडे यंदाच्या लिलावात सर्वाधिक 64.3 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर 43.4 कोटी रकमेसह चेन्नई सुपर किंग्सचा क्रमांक लागतो. सनरायझर्स हैदराबाद 25.5 कोटींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
अंतिम यादीत इंग्लंडचे 21 तर ऑस्ट्रेलियाचे 19 खेळाडू
अंतिम यादीत इंग्लंडचे 21 खेळाडू आहेत. यामध्ये विकेटकीपर जेमी स्मिथ, वेगवान गोलंदाज गस एटकिंसन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टेस्ट ओपनर बेन डकेट यांचा समावेश आहे. कॅमरन ग्रीनवर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण 19 खेळाडू यादीत असून ग्रीन व्यतिरिक्त जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली आणि ब्यू वेबस्टर ही नावे आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे 15 खेळाडू लिलावासाठी पात्र ठरले. डी कॉक आणि मिलरसह एनरिख नॉर्किया, लुंगी एनगिडी, गेराल्ड कोएट्झी आणि ऑलराउंडर वियान मुल्डर यांची नावे आहेत. वेस्ट इंडिजचे 9 खेळाडू यादीत असून त्यात अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, एकीम ऑगस्टे, शाई होप आणि रोस्टन चेस यांचा समावेश आहे.
श्रीलंकेचे 12 खेळाडू यादीत सामील झाले आहेत. त्यामध्ये वानिंदू हसरंगा, दुनीथ वेल्लालेज, महेश तीक्षाना, त्रवीन मॅथ्यू, पथुम निशांका, कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांचा समावेश आहे. न्यूजीलंडचे 16 आणि अफगाणिस्तानचे 10 खेळाडू या यादीत आहेत. न्यूजीलंडचा तरुण स्टार रचिन रवींद्रही या यादीत असून त्याला यंदा चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केले होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये रहमानुल्लाह गुरबाज आणि नवीन-उल-हक ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत.
हे ही वाचा -