IPL 2027 Impact Player Rule Update : आयपीएलमध्ये 2023 पासून लागू करण्यात आलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. या नियमामुळे सामन्यांमध्ये रणनीतीला नवे वळण मिळाले असले, तरी फलंदाजांना अधिक फायदा आणि गोलंदाजांवर अन्याय होत असल्याची टीका अनेक दिग्गज खेळाडूंनी केली आहे. आता या नियमाच्या भवितव्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींना इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत आपापले मत आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सोमवार, 31 ऑगस्टपर्यंत सर्व संघांना आपली भूमिका बोर्डाकडे मांडायची आहे. त्यामुळे आगामी काळात या नियमात मोठा बदल होण्याची किंवा हा नियम पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
IPLचा ‘गेमचेंजर’ नियम धोक्यात
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व 10 संघांकडून या नियमाबाबत अभिप्राय मागवला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2026 मध्येही या नियमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यंदाच्या हंगामात संघांनी मोठ्या धावसंख्येचे अनेक विक्रम केले आणि 200 पेक्षा अधिक धावसंख्या वारंवार पाहायला मिळाल्या. यामुळे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे फलंदाजांना अतिरिक्त फायदा मिळतो आणि गोलंदाजांसाठी परिस्थिती अधिक कठीण होते, असा दावा केला जात आहे. त्यामुळे हा नियम गोलंदाजविरोधी असल्याची टीकाही सातत्याने होत आली आहे.
BCCI सचिवांकडून आधी नियमाचे समर्थन
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमावर पुनर्विचार केला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी या नियमाचे समर्थनही केले होते. सैकिया यांच्या मते, या नियमामुळे केवळ मोठ्या धावसंख्येचे सामने होत नाहीत, तर कमी धावसंख्येचे सामनेही चाहत्यांना आवडले आहेत. तसेच गोलंदाजांनाही विकेट मिळत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता बीसीसीआयने थेट सर्व फ्रँचायझींकडून या नियमाबाबत अहवाल मागवल्याने त्याच्या भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
रोहित, हार्दिक, श्रेयसपासून गिलपर्यंत विरोध
इम्पॅक्ट प्लेअर नियमाला अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंनी उघडपणे विरोध केला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंनी या नियमामुळे संघरचनेवर आणि विशेषतः गोलंदाजांच्या भूमिकेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. गोलंदाजांना सामन्यातून एक अतिरिक्त फलंदाज अचानक समोर येतो, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला परिस्थितीनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज वापरण्याची संधी मिळते. त्यामुळे सामन्याचे संतुलन बिघडत असल्याचा युक्तिवाद केला जातो.
2023 मध्ये झाली होती नियमाची सुरुवात
आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम पहिल्यांदा 2023 च्या हंगामात लागू करण्यात आला. या नियमानुसार टॉसपूर्वी प्रत्येक संघाला पाच पर्यायी खेळाडूंची यादी द्यावी लागते. सामन्यादरम्यान या पाच खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानात उतरवता येते. विकेट पडल्यानंतर, ओव्हर संपल्यानंतर किंवा डाव संपल्यानंतरही ठराविक परिस्थितीत हा बदल करता येतो. ज्या खेळाडूच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मैदानात येतो, तो खेळाडू पुन्हा त्या सामन्यात खेळू शकत नाही.
हे ही वाचा -
