GT vs RR Match Fixing Allegation : आयपीएल 2026 मधून राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी मुल्लांपुर येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून 7 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर रियान परागचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. मात्र, या सामन्यात घडलेल्या काही संशयास्पद घटनांमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी हा सामना 'फिक्स' असल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे.
टॉस दरम्यानचा मोठा गोंधळ (Toss Controversy GT vs RR Qualifier 2 IPL 2026)
सामन्याची सुरुवातच वादाने झाली. नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलने टॉस हवेत फेकला आणि राजस्थानच्या रियान परागने हेड्स अशी हाक दिली. जमीनवर पडलेला सिक्का टेल्स होता, म्हणजेच गुजरातने टॉस जिंकला होता. मात्र, मॅच रेफरीने आपल्याला आवाज ऐकू आला नसल्याचे सांगत पुन्हा टॉस करण्यास सांगितले. दुसऱ्यांदा झालेल्या टॉसमध्ये राजस्थानने बाजी मारली. "जर टीव्हीवरील प्रेक्षकांना परागचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, तर रेफरीला कसा ऐकू आला नाही?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत. तसेच, यादरम्यान शुभमन गिलच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसत होता.
स्टार फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
क्वालिफायरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सपशेल कोसळली. वैभव सूर्यवंशी, रवींद्र जडेजा आणि दिनेश फरेरा यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांसारखे स्टार खेळाडू झटपट बाद झाले. खुद्द कर्णधार अवघ्या 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एवढ्या मोठ्या सामन्यात फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने चाहत्यांचा संशय अधिक बळावला.
साई सुदर्शनचा 'हिट विकेट' ड्रामा
गुजरात टायटन्स जेव्हा 215 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत होती, तेव्हा साई सुदर्शन अप्रतिम फॉर्मात खेळत होता. त्याला बाद करणे राजस्थानच्या गोलंदाजांना अशक्य वाटत होते. मात्र, मागच्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात सुदर्शन अतिशय विचित्र पद्धतीने 'हिट विकेट' झाला. एका सेट फलंदाजाचे असे बाद होणे चाहत्यांना पटलेले नाही. सोशल मीडियावर युजर्स या संपूर्ण प्रकाराला आयपीएलची स्क्रिप्टिंग म्हणत ट्रोल करत आहेत. मात्र, क्रिकेटमध्ये अशा घटना अनेकदा दबावामुळे किंवा चुकीमुळे घडू शकतात, त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील आरोपांवरून फिक्सिंगचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
हे ही वाचा -
