मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघान लॉर्ड्सवर इंग्लडच्या महिला संघावर विजय मिळवत नवा इतिहास घडवला. जागतिक क्रिकेटची पंढरी अशी ओळख लाभलेल्या लॉर्ड्स वरती खेळवण्यात आलेल्या महिलांचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकलाय. या कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवला नाही. या कसोटीमध्ये भारताने इंग्लंडला विजयासाठी 457 धावांंचं डोंगरा एवढा आव्हान दिलं होतं पण यजमान इंग्लंडला ते आव्हान पेलवलं नाही. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 186 धावांमध्ये आटोपला आहे. भारतीय महिलांच्या नावावरती वनडे विश्व चषक विजयानंतर आता लॉर्ड्सवर ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद झाली आहे. 

Continues below advertisement

लॉर्डसवर 142 वर्षात पहिली महिला कसोटी

लॉर्डसच्या 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतानं इंग्लंडला 270 धावांनी पराभूत केलं आहे. भारतानं चौथ्या डावात इंग्लंड समोर विजयासाठी 457 धावंचं आव्हान ठेवलं होतं. भारताला पहिल्या डावात 115 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं 341 धावांवर डाव घोषित केला होता. इंग्लंडचा तिसऱ्या दिवशीच पराभव निश्चित झाला होता. कारण इंग्लंडनं 59 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. मात्र एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन यांच्या अर्धशतकामुळं इंग्लंडच्या विजयाचा आशा कायम होत्या. मात्र, संघ 186 धावांपर्यंत पोहोचू शकला.

क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी

भारताचा पहिला डाव 285 धावांवर आटोपला होता. भारताच्या क्रांती गौडनं इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या. त्यामुळं इंग्लंडचा संघ 170 धावांवर बाद झाला. पहिल्या डावातील आघाडीचा भारताला फायदा झाला. क्रांती गौडनं दोन्ही मॅचमध्ये मिळून 7 विकेट घेतल्या, तर स्नेह राणानं 6 विकेट घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात यास्तिका भाटियानं 113 धावांची खेळी केली. 

Continues below advertisement

इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये पाच विकेट्स घेणारी क्रांती गौड आणि भारताच्या दुसऱ्या डावात शतक झळकावणारी यास्तिका भाटिया यांची नावही लॉर्डच्या ऐतिहासिक फलकावरती आता कायमची कोरली गेली आहेत.लॉर्डसला क्रिकेटची पंढरी तिथं कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील कसोटी सामना पार पडला. या चार दिवसांच्या कसोटी सामन्यात भारतान विजय मिळवणं हा खरोखर एक मोठा इतिहास आहे. भारतीय महिला संघानं लॉर्डसवर कसोटी सामन्यात विजय मिळवणं  भारताच्या क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण आहे.   

 दरम्यान, लॉर्डसवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 1884 मध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 142 वर्षांनी पहिला महिला कसोटी सामना खेळवण्यात आला. ज्यात भारतीय महिलांनी विजय मिळवत इतिहास रचला.