Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
Team India Women Asia Cup 2026: दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, टीम इंडियाने मोहसीन नक्वीला पुन्हा जागा दाखवली, ट्रॉफी स्वीकारण्यास नकार, मैदानात काय घडलं?

Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: भारताच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी दुबईत रंगलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत विजेतेपद जिंकले. या सामन्यानंतर दुबईतील (Dubai) मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यानंतर आशियाई क्रिकेट समितीचे प्रमुख आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून विजेत्या संघाला चषक दिला जाणार होता. मात्र, टीम इंडियाने मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घ्यायला नकार दिला. त्यामुळे मोहसीन नक्वी हे पुढचा अपमान टाळण्यासाठी दुबईतील मैदानातून निघून गेले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोहसीन नक्वी हे मैदानातून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी मैदानातील भारतीय प्रेक्षक मोठ्या आवाजात त्यांची हुर्रे उडवताना दिसत आहेत. या सगळ्या नाट्यमय घडामोडींची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहे. (India Champion Women Asia Cup 2026)
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर खेळाडू हे अंतिम सामना जिंकल्यानंतर मैदानात सेलीब्रेशन करत होते. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार होता. त्यासाठी मोहसीन नक्वी हे स्टेजवर उभे होते. त्यांच्या हातून टीम इंडियाला आशिया कप दिला जाणार होता. टीम इंडियाची फलंदाज स्मृती मानधना ही पुरस्कार सोहळ्यावेळी स्टेजजवळ आली. मात्र, मोहसीन नक्वी समोर उभे असल्याचे दिसताच स्मृती मानधना माघारी फिरली आणि थेट ड्रेसिंग रुममध्ये गेली. यानंतर श्रीलंकेच्या संघाने उपविजेते म्हणून त्यांचा स्मृतीचिन्ह, धनादेश आणि पदकं स्वीकारली. मात्र, भारतीय संघाने आशिया चषकाची ट्रॉफी आणि पदकं स्वीकारली की नाही किंवा आता हे सगळे भारतीय संघाला कशाप्रकारे दिले जाणार, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. या सगळ्या प्रकारानंतर मोहसीन नक्वी हे मैदानातून बाहेर पडले. तेव्हादेखील भारतीय प्रेक्षकांनी त्यांची हुर्रे उडवल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
यापूर्वी भारताच्या पुरुष संघानेही आशिया कपची ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्याकडून स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा मोहसीन नक्वी हे ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. बरेच दिवस ही ट्रॉफी त्यांच्याकडे होती. यावरुन बराच वादंग झाला होता.
Mohsin Naqvi was standing on the podium to present the trophy. When Smriti Mandhana came out and saw him standing there, she went back into the dressing room. pic.twitter.com/al1fQ6wXu5
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 13, 2026
India Champion Women Asia Cup 2026 : टीम इंडियाकडून श्रीलंकेचा पराभव
भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा तब्बल 72 धावांनी पराभव करत आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने दमदार सुरुवात केली. स्मृती मानधाना आणि शफाली वर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या. भारताची धावसंख्या 13.4 षटकांत 132 होती. भारत सहजपणे 200 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते. मात्र, शेवटच्या 38 चेंडूंमध्ये फक्त 51 धावा झाल्या. हरमनप्रीत कौरने 14 चेंडूंमध्ये 14 धावा, रिचा घोषने 17 धावा आणि दीप्ती शर्माने 5 धावा केल्या आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 183 धावा केल्या. 184 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसून आला. श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजीला मोठे धक्के दिले. अखेर श्रीलंकेचा संघ निर्धारित 20 षटकांत 111 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
आणखी वाचा



















