Indian team to meet PM Narendra Modi News : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकत (India beat South Africa first World Cup title) पहिल्यांदाच चॅम्पियन बनून इतिहास रचला, ज्यामुळे सध्या संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या ऐतिहासिक विजयानंतर 5 नोव्हेंबर रोजी टीममधील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या. या वेळी खेळाडूंनी पंतप्रधानांसोबत फोटो काढले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोत पंतप्रधान मोदी या ट्रॉफीसह कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या मध्ये उभे दिसतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी (ICC Women's World Cup trophy) हाताने स्पर्शही केली नाही. यामागे एक खास कारण आहे.
पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का नाही हात लावला?
असं मानलं जातं की, वर्ल्ड कपची ट्रॉफी फक्त विजेत्यांनाच हाताळण्याचा अधिकार असतो. ही परंपरा विजेत्यांचा सन्मान आणि त्यांच्या परिश्रमांचा गौरव दर्शवते. पंतप्रधान मोदींनीही हीच परंपरा जपत ट्रॉफीला हात लावण्याचं टाळलं आणि संपूर्ण श्रेय खेळाडूंनाच दिलं. जरी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना ट्रॉफीला हात लावण्याचा अधिकार आहे, तरी त्यांनी खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसं केलं नाही. या भेटीत त्यांनी खेळाडूंशी त्यांच्या विजयाच्या प्रवासाबद्दल संवाद साधला, त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही पहिली वेळ नाही की पंतप्रधान मोदींनी असं काही केलं आहे, याआधी 2024 सालीही टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय पुरुष संघ वेस्ट इंडीजहून थेट दिल्लीला आला होता. त्या वेळीही टीमने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. फोटोसेशन दरम्यान मोदी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मध्ये उभे होते, पण त्या वेळीदेखील त्यांनी टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफीला हात लावला नव्हता.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण
आयसीसी महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवणं हे भारतासाठी स्वप्नासारखं आहे. या स्पर्धेला 1973 मध्ये सुरुवात झाली होती, पण भारताला याआधी कधीही किताब मिळाला नव्हता. दोन वेळा भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, पण ट्रॉफीपासून एक पाऊल दूर राहिला होता. अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने हा दीर्घकाळाचा प्रतीक्षेचा शेवट केला. या विजयाने भारतीय महिला क्रिकेटचा नवा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे.
हे ही वाचा -