Indian Cricketer Tax Paid: भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने यंदा (2023-24) सर्वाधिक कर भरल्याची माहिती समोर आली आहे. फॉर्च्युन इंडियाच्या यादीनुसार विराट कोहलीने 66 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंत आणि इतर अनेक कलाकारांनी विराटपेक्षा जास्त कर भरला आहे.
शाहरुख खानने (Shahrukh Khan) 92 कोटी रुपये, तमिळ अभिनेता विजयने 80 कोटी रुपये, सलमान खानने (Salman Khan) 75 कोटी रुपये आणि अमिताभ बच्चनने (Amitabh Bacchan) 71 कोटी रुपये कर भरला आहे. तर क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक कर भरला आहे. त्यानंतर एमएस धोनी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Saurav Gangully), हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) यादीत समावेश आहे. एमएस धोनीने (MS Dhoni) 38 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. तर सचिन तेंडुलकरने 28 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
कोणत्या क्रिकेटपटूंनी किती कर भरला?
कर भरणाऱ्यांच्या यादीत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे, ज्याने 28 कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यांच्याशिवाय सौरव गांगुलीने 23 कोटी रुपये, हार्दिक पांड्याने 13 कोटी रुपये आणि ऋषभ पंतने 10 कोटी रुपयांचा मोठा कर भरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा मात्र या यादीत टॉप-20 मध्येही समावेश नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विराट कोहली - 66 कोटी
एमएस धोनी - 38 कोटी
सचिन तेंडुलकर - 28 कोटी
सौरव गांगुली - 23 कोटी
हार्दिक पांड्या - 13 कोटी
विराट कोहलीची कमाई कुठून होते?
विराट कोहली BCCI च्या A+ श्रेणीमध्ये येतो, ज्यासाठी त्याला वार्षिक 7 कोटी रुपये वेतन मिळते. याशिवाय ते एमआरएफ कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्याचे 'WROGN' आणि 'One8' मध्ये शेअर्स आहेत. कपड्यांच्या ब्रँड प्यूमासोबत विराट कोहलीने करार केला आहे. इतर प्रायोजक आणि शूटिंग जाहिरातीमधूनही विराट कोहलीची दमदार कमाई आहे.
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती?
सचिनची एकूण संपत्ती सुमारे 170 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 1410 कोटी रुपये आहे. निवृत्तीनंतरही सचिन दर महिन्याला जाहिराती आणि इतर माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करत आहे. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीला एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी तो अजूनही जाहिरातींच्या जगतात वर्चस्व गाजवत आहे. आजही मास्टर ब्लास्टर मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये चौकार-षटकार मारताना दिसतो. एका वेबसाइटनुसार, सचिन तेंडुलकरचे मासिक उत्पन्न 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्याचे वार्षिक उत्पन्न 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सचिन अनेकदा टीव्हीवर अपोलो टायर्स, आयटीसी सॅव्हलॉन, जिओ सिनेमा, स्पिनी आणि एजस फेडरल लाइफ इन्शुरन्ससारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसतो. सचिनला जाहिरातींमधून वर्षाला सुमारे 40 कोटी रुपये मिळतात, तर गुंतवणुकीतून 10 कोटी रुपये कमावतात. त्यांचे मुंबई आणि केरळमध्ये आलिशान बंगले आहेत.