Indian Team, Sree Padmanabhaswamy Temple : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना 31 जानेवारी (शनिवार) रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.

Continues below advertisement

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश होता. खेळाडू मंदिरात पोहोचल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याचे पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये स्पिनर वरुण चक्रवर्ती, कर्णधार सूर्यकुमार यादव, फिनिशर रिंकू सिंग, चायनामन स्पिनर कुलदीप यादव, स्पिनर रवि बिश्नोई, ऑलराउंडर अक्षर पटेल तसेच फील्डिंग कोच टी. दिलीप हे सर्व स्पष्टपणे दिसत आहेत.

Continues below advertisement

चौथा टी-20 गमावल्यानंतर शेवटच्या सामन्याकडे लक्ष

न्यूझीलंडविरुद्ध नागपूर, रायपूर आणि गुवाहाटी येथे खेळवलेल्या पहिल्या तीन टी20 सामन्यांमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने मालिका आधीच आपल्या नावावर केली होती. मात्र विशाखापट्टनम येथे खेळवलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताला 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

मालिका विजयाने संपवण्याचा भारताचा निर्धार

चौथा सामना गमावल्यानंतर आता पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना जिंकून मालिका 4-1 ने संपवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मालिका आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारताची अखेरची टी-20 मालिका आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवून तयारीला अंतिम टप्प्यावर नेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

वनडे मालिकेत मात्र न्यूझीलंड वरचढ

उल्लेखनीय बाब म्हणजे टी-20 मालिकेपूर्वी खेळवलेल्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 50 षटकांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-1 असा विजय मिळवला. भारताने पहिला सामना जिंकत चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर न्यूझीलंडने पुढील दोन्ही सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. 

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, हर्षित राणा.

न्यूझीलंड संघ : जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ईश सोढी, जेकब डफी, मिचेल सँटनर (कर्णधार), मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, टिम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, फिन अ‍ॅलन, रचिन रवींद्र, झॅकरी फॉक्स, बेवॉन जेकब्स.

हे ही वाचा -

Quinton De Kock News : डी कॉकचा तांडव! 10 षटकारांसह 115 धावा, रोहित शर्माचा मोठा विक्रम गाठला