Indian Cricket Team T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेच टी20 विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. एक जून पासून टी20 विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. तर आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी रंगणार आहे. म्हणजेच, आयपीएल संपल्यानंतर पाच दिवसांमध्येच टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यामुळे टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडिया कधी जाणार? टी20 विश्वचषकापेक्षा आयपीएल महत्वाचं आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल सुरु असतानाच टीम इंडिया अमेरिकेला विश्वचषकासाठी रवाना होणार असल्याचं समोर आले आहे. 


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ 21 मे रोजी विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. आयपीएलमधील प्लेऑफमध्ये न पोहचणाऱ्या संघातील खेळाडू 21 मे रोजी अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. पहिल्या बॅचमध्ये टीम इंडियाचे कोण कोणते खेळाडू रवाना होतील, हे आयपीएलमधील संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सध्या आयपीएलचा थरार ऐन रंगात आलाय. त्यातच अद्याप टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा झालेली नाही.  


अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे एक मे पासून टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. एक मे रोजी विश्वचषकासाठी संघाची निवड करण्यासाठी आयसीसीनं सर्वांना मुदत देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांच्या आत टीम इंडियाची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघात कोण कोणत्या शिलेदारांची निवड होणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सलामीसाठी कोण असेल? अष्टपैलू खेळाडू कोण कोण? फिरकी गोलंदाज कोण? कोणत्या विकेटकीपरला स्थान दिलं जाईल? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 


कुणाला मिळणार स्थान?


टी20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल की विराट कोहलीला संधी मिळणार? याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. विकेटकीपरमध्ये कोणत्या दोन जणांची निवड होणार? ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये स्पर्धा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियात कुणाची वर्णी लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठऱणार आहे.


विराटला बाहेर बसवा, अनेकांची मागणी - 
 
टी20 विश्वचषकासाठी रनमशीन विराट कोहलीला संघात स्थान देऊ नका, अशी मागणी अनेक क्रीडा चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी केली आहे.  दिग्गज क्रिकेटर्स आणि एक्सपर्ट्स यांनी आपल्या संघात विराट कोहलीला स्थान दिले नाही. त्यामुळे टीम इंडियात विराट कोहलीला स्थान मिळतेय? याकडेही लक्ष लागलेय.