India won by 2 wickets Pakistan Asian Legends League 2026 : झांबियामध्ये सुरू असलेल्या एशियन लीजेंड्स लीगच्या दुसऱ्या हंगामात भारताच्या इंडिया रॉयल्सने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान पँथर्सचा रोमांचक लढतीत 2 विकेट्सने पराभव केला. सामन्याच्या एका टप्प्यावर भारताची अवस्था 60 धावांत 4 बाद अशी झाली होती. मात्र ऋषी धवन आणि सुबोथ भाटी यांच्या भागीदारीमुळे भारताने अशक्य वाटणारा विजय मिळवला. या विजयासह इंडिया रॉयल्सने स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवत आधी बांगलादेश आणि आता पाकिस्तानला धूळ चारली.

Continues below advertisement

पाकिस्तानची वादळी फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान पँथर्सने 20 षटकांत 6 बाद 167 धावांचा स्पर्धात्मक स्कोअर उभारला. संघाचा कर्णधार इमरान नझीरने आक्रमक खेळी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याला इबरार हुसेन आणि तौफीक उमर यांनीही उत्तम साथ दिली. दोघांनीही 39-39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत पाकिस्तानला मजबूत धावसंख्या उभारून दिली. भारताकडून शादाब जकाती आणि सुबोथ भाटी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकिस्तानच्या धावगतीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले.

Continues below advertisement

भारताची खराब सुरुवात

168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया रॉयल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. 29 धावांवर नमन ओझा बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर अभिषेक जलोटाने काही आकर्षक फटके खेळत 19 चेंडूत 30 धावा केल्या, मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेला असद पठाण केवळ 9 धावा करून माघारी परतला. अवघ्या 60 धावांवर भारताने 4 विकेट्स गमावल्याने पाकिस्तानचे पारडे जड दिसू लागले होते.

ऋषी धवन आणि सुबोथ भाटीची विजयी भागीदारी

संकटाच्या क्षणी ऋषी धवन आणि सुबोथ भाटी यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी संयमाने फलंदाजी करत आवश्यक वेळी मोठे फटकेही खेळले. ऋषी धवनने 32 चेंडूत अर्धशतक झळकावत 50 धावांची मोलाची खेळी केली. तर सुबोथ भाटीने 46 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरीस अनुरित सिंग 12 धावांवर आणि वीर प्रताप सिंग 2 धावांवर नाबाद राहिले. त्यांच्या साथीने इंडिया रॉयल्सने 2 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला.

सलग दुसरा विजय

या विजयासह इंडिया रॉयल्सने स्पर्धेत दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशवर मात केली होती, तर आता पाकिस्तानलाही पराभूत करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. 60 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतरही भारताने केलेला हा विजय संघाच्या लढाऊ वृत्तीचे उत्तम उदाहरण ठरला.

हे ही वाचा -

महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad